Maratha Reservation: शिंदे गटाच्या खासदारांसमोरच कोल्हापुरात मुख्यमंत्र्याविरोधात घोषणाबाजी, तणावाचे वातावरण
By पोपट केशव पवार | Published: October 31, 2023 01:07 PM2023-10-31T13:07:54+5:302023-10-31T13:08:41+5:30
राज्य सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास विलंब लागत असल्याने कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज, मंगळवारी शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्यासमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवतील प्रदक्षिणा घालत राज्य सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून आरक्षण दिले नाही तर मी सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून तुमच्या या लढ्यात सहभागी होईन असे सांगत मंडलिक यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्ना केला.
मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणस्थळी खा. मंडलिक यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी माजी नगरसेविका भारती पोवार यांनी गायकवाड समितीचा अहवाल कोर्टात सादर केला नसल्याने आरक्षण मिळाले नाही. संसदेत तुम्ही याचा जाब का विचारत नाही असा सवाल खा. मंडलिक यांना केला.
यावर मंडलिक यांनी मी मराठा समाजाबरोबरच आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना मी आरक्षणाबाबत आपल्या भागाची भूमिकाही समजावून सांगितली आहे. त्यामुळे कोणत्याही परस्थितीत आरक्षण मिळायलाच हवे यासाठी मी आग्रही असल्याच सांगितले. यावेळी सकल मराठा समाजाचे काही पदाधिकारी व शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी खा.मंडलिक यांच्यासमोर मुख्यमंत्र्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, मंजित माने, राजू यादव, महेश उत्तुरे, शुभांगी पवर उपस्थित होते.
शिंदे गटाचे खासदार सामुदायिक राजीनामे देतील
शिंदे गटाचे आमदार व खासदार यांची आज मंगळवारी सायंकाळी ६ वाजता मुंबईत बैठक आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची दाहकता लक्षात येण्यासाठी सर्वच खासदारांनी सामुदायिक राजीनामे देण्याबाबत विनंती करणार असल्याचे खा.मंडलिक यांनी सांगितले. जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांना जाणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.