गतीमंद बालकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू ! गडहिंग्लज तालुक्यात हळहळ :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:38 AM2021-07-21T11:38:46+5:302021-07-21T11:41:29+5:30
Accident Gadhinglaj Kolhapur : हातपाय धुण्यासाठी शेततळ्याकडे गेलेल्या गतीमंद बालकाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. वेदांत राजेश पवार (वय ९, मूळ गाव निपाणी, जि. बेळगांव, सध्या रा. करंबळी, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे.
गडहिंग्लज : हातपाय धुण्यासाठी शेततळ्याकडे गेलेल्या गतीमंद बालकाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. वेदांत राजेश पवार (वय ९, मूळ गाव निपाणी, जि. बेळगांव, सध्या रा. करंबळी, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे.
ग्रामस्थ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मंगळवार (२०) दुपारी वेदांत हा इंद्रायणी पाटील यांच्या शेततळ्याकडे गेला होता. दरम्यान, हातपाय धुण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी शेततळ्यात गेला होता. त्यावेळी पाय घसरून तो शेततळ्यात पडला.
गतीमंद असल्यामुळे त्याला हालचाल व आरडाओरड करता आली नाही. आजूबाजूलाही कोणी नसल्यामुळे त्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला.शोधाशोध करतांना त्याचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला.
त्याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील व बहिण असा परिवार आहे.मारूती वांद्रे यांच्या वर्दीवरून घटनेची पोलिसात नोंद झाली आहे. हेडकॉन्स्टेबल विठ्ठल मुळीक अधिक तपास करीत आहेत.
हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
वेदांत हा लहानपणापासूनच आजोळी करंबळीमध्ये राहत होता. त्यामुळे आजी-आजोबांचा त्याच्यावर खूप लळा होता. एकुलत्या मुलाच्या दुर्देवी मृत्यूने आई-वडीलांसह आजी-आजोबांनी व बहिण वैष्णवीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.