गाळप हंगामाला वेग, सात कारखान्यांचे भवितव्य अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:04 PM2019-11-29T12:04:42+5:302019-11-29T12:06:13+5:30
कोल्हापुरातील वारणा आणि आजरा या दोन कारखान्यांनी अजूनही गाळपासाठी परवाना मागणी केलेली नाही. त्यांपैकी वारणा कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी चालविली आहे; पण आजरा कारखान्याच्या पातळीवर सामसूम दिसत आहे.
कोल्हापूर : राज्यातील सत्तारोहणाच्या घडामोडींत व्यस्त असतानाही गळीत हंगामावर कोणताही परिणाम झालेला नाही. ऊस परिषदेनंतर अधिकृतपणे सुरू झालेल्या गाळपानुसार गेल्या सात दिवसांत कोल्हापूर विभागातील १० कारखान्यांनी दोन लाख ४५ हजार २१२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ७.३५ टक्के आहे. दरम्यान, हंगाम वेग घेत असताना अजूनही विभागातील सात कारखान्यांचे भवितव्य अधांतरीच आहे. त्यात वारणा कारखान्याचा अपवाद वगळता उर्वरित सहा कारखान्यांच्या सुरू होण्यावरच अनिश्चिततेचे सावट आहे.
कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्यानंतर १६ नोव्हेंबरपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांनी गव्हाणीत मोळ्या टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ केला; पण ऊस परिषदेच्या धास्तीमुळे गाळपाला दबकतच सुरुवात केली होती. परिषदेत आंदोलनाची भूमिका ठरलेली नसल्याचा फायदा उचलत २२ पासूनच अधिकृतपणे गळितास सुरुवात झाली आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडील माहितीनुसार जिल्ह्यात आजच्या घडीला कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापुरातील १९ व सांगलीतील १२ असे ३१ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. कोल्हापुरातील जवाहर व सांगलीतील सर्वोदय व विश्वास हे दोन कारखाने १ डिसेंबरला सुरू होत आहेत.
कोल्हापुरातील वारणा आणि आजरा या दोन कारखान्यांनी अजूनही गाळपासाठी परवाना मागणी केलेली नाही. त्यांपैकी वारणा कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी चालविली आहे; पण आजरा कारखान्याच्या पातळीवर सामसूम दिसत आहे. हंगाम सुरू होईल की नाही, याबाबतच आता साशंकता व्यक्त होत आहे. सांगलीतील माणगंगा कारखान्याने हंगाम सुरूच करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महांकाली, तासगाव, डफळे- जत, यशवंत- खानापूर हे कारखाने चालू करण्याबाबत अनिश्चितता दिसत आहे.
आता प्रतीक्षा बैठकीची
आता हंगामाने वेग घेतला असला तरी पहिली उचल किती मिळणार हे अजून ठरलेले नाही. एफआरपी अधिक २०० रुपये अशी मागणी ‘स्वाभिमानी’ने केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ऊस परिषदेनंतर साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक होणार होती; पण राज्यातील सत्तास्थापनेत सर्वचजण गुंतल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक कधी होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.
उता-यात ‘खासगी’ सरस
कोल्हापूर विभागात गेल्या सात दिवसांत झालेल्या गाळपातून एक लाख ८० हजार २७० मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उतारा मात्र केवळ ७.३५ टक्के आहे. त्यातही खासगी कारखाने सरस ठरले आहेत. त्यांचा उतारा ७.३७ टक्के, तर सहकारी कारखान्यांचा ७.३४ टक्के आहे. विभागात राजाराम सहकारी कारखान्याचा १.३३ टक्के इतका सर्वांत कमी उतारा आहे; तर सांगलीच्या ‘उदगिरी शुगर’ या खासगी कारखान्याचा ९.४४ टक्के इतका सर्वोच्च उतारा नोंदविला गेला आहे.