वडगाव बाजारपेठेवर मंदीचे सावट
By admin | Published: September 8, 2015 11:24 PM2015-09-08T23:24:20+5:302015-09-08T23:24:20+5:30
ग्राहकांचा खरेदीकडे आखडता हात : दुष्काळ सदृश परिस्थिती, उसाची बिले न मिळाल्यामुळे अवस्था
सुहास जाधव- पेठवडगाव -दुष्काळ सदृश परिस्थिती व ऊस बिलाचा हप्ता न मिळाल्यामुळे वडगाव बाजारपेठेत मंदीचे सावट जाणवू लागले आहे. आवश्यक गरजेच्या वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. तर अन्य चैनीच्या वस्तू खरेदीकडे ग्राहकांनी हात आखडता घेतला असल्याचे चित्र वडगाव परिसरात दिसून येत आहे . वडगाव ही परिसरातील ३२ गावांची हक्काची बाजारपेठ आहे. येथे धान्य, कापड, सोने, भाजी, किराणा दुकानात मोठी उलाढाल होते. तर सोमवारी आठवडी बाजारात कोट्यवधींची उलाढाल असते. वडगावचा जनावरांचा बाजार हा राज्यात प्रसिद्ध आहे. वडगाव परिसर हा सधन आहे. नेहमी दुधोंडी, वारणा नदी भरून वाहते. त्यामुळे नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. अगदी ताजे पैसे मिळण्याची तजवीज असते. या परिसराला पावसाळ््याने कधीही दगा दिलेला नाही, असा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रथमच पावसाने हात आखडता घेतला आहे. त्यामुळे खरीप हंगामासह ऊस, चारा, सुकून गेला आहे. त्यात शेतीवर काम करणाऱ्या रोजंदारी, खत यात वाढ झाल्यामुळे शेती पिकाचे उत्पादन मूल्य वाढले आहे. दरम्यान, गत हंगामात एकाच कारखान्याने प्रथम हप्ता अडीच, नंतर २२00, १९00 असे वेगवेगळ््या प्रकारे दिलेले आहेत. तर दुसरा हप्ता किती मिळणार यांची शेतकऱ्यांना उत्सुकता असताना यासाठी शासन मतद करणार अशी आशा निर्माण झाली. याचा परिणाम उसाचा दुसरा हप्ता न देण्यावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दामाचे पैसे साखर कारखानदाराकडे रखडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. उद्योगधंदे, जमीन खरेदी- विक्रीतही, मंदी आहे. पुरेशा पावसाअभावी व उसाचा दुसरा हप्ता न मिळाल्यामुळे वडगाव बाजारपेठेत मंदी आहे. नव्याने वस्तू खरेदीसाठी निरूत्साह आहे. सध्या बाजारपेठेत अत्यावश्यक वस्तंूची खरेदी होत असली, तरी सुद्धा आमच्याकडे किराणा दुकानाच्या विक्रीसाठी विविध एजन्सी आहेत. त्यातील २0 टक्के उलाढाल कमी झाल्याचे दिसत आहे. - अमोल हुकेरी, उद्योजक
अमोल ट्रेडर्स
सध्या सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार होत आहे. उसाचा दुसरा हप्ता मिळाला नसल्यामुळे तसेच पावसाने पाठ फिरविल्यामुळे बळिराजा अस्वस्थ आहे. त्यामुळे गरजेपुरती खरेदी विक्री होत आहे. सोन्याची गुंतवणूक बंद झाल्यामुळे सराफ व्यवसायात मंदी आहे.
- रमेश बेलेकर, सोने व्यापारी -पार्वती ज्वलर्स