गोव्यात आढळली छोटी निशाचर, दुर्मीळ पाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:34+5:302021-09-07T04:29:34+5:30
कोल्हापूर : सहसा पश्चिम घाटात आढळणाऱ्या पालीच्या एका नव्या प्रजातीचा शोध गोव्याच्या उत्तर पश्चिम घाटात लागला आहे. हे संशोधन ...
कोल्हापूर : सहसा पश्चिम घाटात आढळणाऱ्या पालीच्या एका नव्या प्रजातीचा शोध गोव्याच्या उत्तर पश्चिम घाटात लागला आहे. हे संशोधन करणाऱ्या सरिसृप अभ्यासकांच्या टीममध्ये कोल्हापूरच्या संशोधकाचा समावेश आहे. ‘हेमीफिलोडॅक्टिलस’ कुळातील ही पाल आकाराने छोटी म्हणून ‘स्लेन्डर’ किंवा ‘वर्म गेको’ म्हणून ओळखली जाते. ही पाल निशाचर, दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ असल्यामुळे तिच्या संरक्षणाची गरज सरिसृप संशोधकांनी व्यक्त केली आहे.
‘हेमीफिलोडॅक्टिलस’ कुळातील या पालींचा अधिवास प्रामुख्याने पश्चिम घाटाच्या दक्षिण पट्ट्यात आढळतो. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील (उत्तरेकडील) पश्चिम घाटामधून या कुळातील पालींची नोंद यापूर्वी नव्हती. मात्र, या कुळातील ही नवी पाल त्यांच्या मूळ अधिवासापासून ५६० किमी दूर गोव्यामध्ये आढळल्याने संशोधकांना नवे संदर्भ मिळाले आहेत. कोल्हापूर येथील सरिसृप अभ्यासक अक्षय खांडेकर यांच्यासह दिकांश परमार, नितीन सावंत, इशान अग्रवाल यांनी ही प्रजात शोधली असून यासंदर्भातील शोधप्रबंध मंगळवार, दि. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी ‘झुटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.
निशाचर व प्रदेशनिष्ठ पाल
३० ते ३५ एमएम इतक्या छोट्या आकाराच्या या पालीची ही प्रजात उत्तर गोव्यातील गोवा विद्यापीठ आणि दक्षिण गोव्यातील चांदोर जिल्ह्यामध्येच आढळल्याने तिचे नामकरण ‘हेमीफिलोडॅक्टिलस गोवाएन्सिस’ असे केले आहे. ही पाल निशाचर असून, झाडावर आणि भिंतींवरही आढळते. गोवा विद्यापीठाच्या परिसरात दिकांश परमार यांना प्रथम ही पाल दिसली. ही माहिती ‘ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन’चे संशोधक अक्षय खांडेकर आणि इशान अग्रवाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी या पालीचा आकारशास्त्र आणि इतर अभ्यास केला तेव्हा, ही पाल नवीन असल्याचे स्पष्ट झाले. आता तिला ‘गोवा स्लेन्डर गेको’ या नावाने ओळखले जाईल.
कोट
या पालीचे कूळ प्रथमच उत्तर पश्चिम घाटामध्ये आढळले असून, ते गोव्यात केवळ दोनच ठिकाणी सापडल्याने ही पाल दुर्मीळ व प्रदेशनिष्ठ आहे. पश्चिम घाटातही या कुळातील पालींचा अधिवास असण्याची शक्यता असल्यामुळे त्याचा अभ्यास करणे व तो सुरक्षित करणे गरजेचे आहे.
-अक्षय खांडेकर,
सरिसृप संशोधक, ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन, कोल्हापूर
------------
फोटो : 060092021-kol-gekkonidae-goa
फोटो ओळी : गोवा स्लेन्डर गेको
06092021-kol-Akshay Khandekar
फोटो ओळी : अक्षय खांडेकर, सरिसृप संशोधक.