यादववाडीच्या शाळेत ‘स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:41+5:302021-06-03T04:17:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : विद्यार्थी हा देशाचं भविष्य आहे. शैक्षणिक साहित्य, भौतिक सुविधा, अध्यापनातील ज्ञान व तंत्रज्ञान ...

'Smart to Global Classroom' at Yadavwadi School | यादववाडीच्या शाळेत ‘स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम’

यादववाडीच्या शाळेत ‘स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

उचगाव : विद्यार्थी हा देशाचं भविष्य आहे. शैक्षणिक साहित्य, भौतिक सुविधा, अध्यापनातील ज्ञान व तंत्रज्ञान याव्दारे चार भिंतीच्या बाहेरील विश्वाची माहिती आभासी स्वरूपात दाखवून त्याचे मनोबल वाढविण्याचा ‘स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम’ पॅटर्न उचगाव (ता. करवीर) येथील जिल्हा परिषद शाळा, यादववाडी येथे साकारला आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे. यासाठी २ लाख २५ हजार रुपयांचा निधी लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खर्च झाला आहे. शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक रवींद्र केदार यांनी तिसरीच्या वर्गात ‘स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे.

त्यांनी वर्गात ऑनलाईन पालक सभा, ऑनलाईन अभ्यास वर्ग, ऑनलाईन विकली टेस्ट, कौन बनेगा वोकॅब मास्टर, संडे इज फंडे, ऑनलाईन निकाल, ग्रेट भेट, लेट्स स्पीक, स्वाध्याय पुस्तिका वाटप आदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. यातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची गोडी लागली. पालकांच्या वर्षभरात तब्बल २५ ऑनलाईन पालक सभा घेऊन पालकांचे प्रबोधन करण्यात आले.

चौकट : या प्रकल्पामुळे दप्तराचे ओझे कमी होणार आहे. लॉकर सुविधा, वर्गस्तरावर ग्रंथालय, कलादालन, ग्रीन ग्राऊंड मॅट, इंट्रक्टिव्ह स्मार्ट बोर्ड व प्रोजेक्टर, संगणक, कराओके सिस्टीम, पिन व शोकेस बोर्ड, शूज स्टँड, आनंददायी वर्गासाठी बोलक्या भिंती साकारल्या आहेत.

या वर्गाला आमदार ऋतुराज पाटील, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, उपशिक्षणाधिकारी जयश्री जाधव, गटविकास अधिकारी जयवंत उगले या मान्यवरांनी भेट दिली आहे.

कोट : २१ व्या शतकातील महत्त्वाच्या गरजा ओळखून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या व सर्वसामान्यांच्या मुलांनाही अद्ययावत भौतिक सुविधा उपलब्ध करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे.

- रवींद्र केदार

शिक्षक, यादववाडी प्राथमिक शाळा

फोटो : ०२ यादववाडी शाळा

ओळ: हरहुन्नरी शिक्षक रवींद्र केदार यांनी लोकसहभाग, ग्रामपंचायत निधीतून यादववाडी जिल्हा परिषद शाळेत ‘स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम’ हा प्रकल्प साकारला आहे.

Web Title: 'Smart to Global Classroom' at Yadavwadi School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.