शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले ‘स्मार्ट होम’ अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 04:40 PM2018-09-26T16:40:44+5:302018-09-26T16:43:33+5:30

मोबाईलशिवाय राहणे अनेकांना असह्य झाले झाले असताना, मोबाईल हे सोईच्या गोष्टींसाठी आहेत, हेच सिद्ध करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनचा विधायक वापर करीत ‘स्मार्ट होम’ हे मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे.

'Smart Home' app created by the students of Shivaji University | शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले ‘स्मार्ट होम’ अ‍ॅप

शिवाजी विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्मार्ट होम अ‍ॅपसोबत प्रा. प्रसन्न करमरकर.

Next
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले ‘स्मार्ट होम’ अ‍ॅपघराला आग, चोर आल्याची कल्पना संबंधित व्यक्तींना मिळणार

प्रदीप शिंदे

 कोल्हापूर : मोबाईलशिवाय राहणे अनेकांना असह्य झाले झाले असताना, मोबाईल हे सोईच्या गोष्टींसाठी आहेत, हेच सिद्ध करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनचा विधायक वापर करीत ‘स्मार्ट होम’ हे मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे घरातील विद्युत उपकरणे बंद करण्यासह घराला आग लागली व चोर आल्याची कल्पना संबंधित व्यक्तींना मिळणार आहे.

तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य सोपे केले; पण माणूस त्याचा अतिवापर, अतिरेक करीत असेल तर तो तंत्रज्ञानाचा दोष नाही. याच तंत्रज्ञानातील मोबाईल हा महत्त्वपूर्ण घटक आहे. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे मोबाईलच्या वापरालाही दोन बाजू आहेत; हीच गोष्ट या संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखविली आहे.

धावपळीच्या युगात आपण परगावी गेल्यानंतर नजरचुकीने घरातील लाईट, टीव्ही, फ्रिज, म्युझिक सिस्टीम बंद करण्याचे विसरतो. यासोबत घराला आग लागली तर कशी समजेल, घरात चोर आल्यास कसे समजेल हा प्रश्न शिवाजी विद्यापीठातील एम. सी. ए. व एम. एस्सी. विभागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पडला. त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून ‘स्मार्ट होम’ हे अ‍ॅप तयार केले आहे.

स्मार्ट अ‍ॅपचा फायदा

घरामधून बाहेर असताना घरातील विद्युत उपकरणे बंद करण्याचे विसरलो तर त्याची माहिती या अ‍ॅपद्वारे समजणार आहे. अ‍ॅपद्वारे हे विद्युत उपकरणे बंद करता येणार आहेत. यामुळे विजेची बचत होणार आहे.

यासह घरामध्ये आग लागल्यानंतर फायर आॅटोमेशनद्वारे अ‍ॅपवर तत्काळ माहिती मिळणार आहे. त्यासह घरातून बाहेर असताना चोर आल्यास तत्काळ आपल्या अ‍ॅपवर कॉल येणार आहे. यासाठी घरातील चार व्यक्तींचे मोबाईल नंबर यामध्ये नोंदविता येणार आहेत. त्यांची माहिती आपल्याला या अ‍ॅपवर कळणार आहे.

यांचा आहे सहभाग

मुरली उत्तम जाधव, कुणाल संभाजी खोत, हृषीकेश अमोल अडके (तिघेही एमसीए भाग - तीन), रोहित शिवाजी आडनाईक, अजय तानाजी माने, पुष्कर कणंगलेकर (एम.एस्सी. संगणकशास्त्र भाग दोन) या विद्यार्थ्यांनी हे अ‍ॅप विकसित केले आहे. साधारणपणे एक बीएचके प्लॉटसाठी त्यांना २५०० ते ३००० रुपयांपर्यंत खर्च आलेला आहे.

हा प्रोजेक्ट अँड्रॉइड मोबाईलला सपोर्ट करतो. एम्बइडेड सी आणि जावा प्रोग्रामिंगचा यात वापर केला आहे. आर्डिनो या उपकरणाचाही वापर केला आहे. हा प्रोजेक्ट अ‍ॅमेझॉन अलेक्सा आणि गुगल होमला सपोर्ट करतो. या प्रोजेक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक सेन्सर वापरला आहे. अ‍ॅपची साईज एक ते दोन एमबी आहे. लवकरच हे अ‍ॅप प्लेस्टोअरवर उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

विजेची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. ही वीज बचत करण्यासाठी हे अ‍ॅप अत्यंत उपयुक्त आहे. वीजबचतीसह घरातील सुरक्षिततेसाठी हे अ‍ॅप खूप मदत करते. लवकरच अ‍ॅप प्ले स्टोअर येण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेत हा प्रयोग सादर केला होता. त्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
- प्रा. प्रसन्न करमरकर,
संगणकशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ

 

Web Title: 'Smart Home' app created by the students of Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.