परिचारकांची जीभ हासडून काढा

By admin | Published: February 28, 2017 12:49 AM2017-02-28T00:49:19+5:302017-02-28T00:49:19+5:30

माजी सैनिकांचा संताप : पंढरपुरात ७ मार्चला मोर्चा

Smash the tongue of the hostesses | परिचारकांची जीभ हासडून काढा

परिचारकांची जीभ हासडून काढा

Next

कोल्हापूर : सैनिकांच्या पत्नींबाबत अनुद्गार काढणारे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांना देशद्रोही ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी मंगळवारी (दि. ७ मार्च) पंढरपूर येथे मोर्चा काढण्याचा निर्णय सोमवारी येथे झाला.
परिचारक यांच्या निषेधार्र्थ येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांचा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी लष्करातील सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन अशोक आवटी हे होते. मेळाव्यात अनेक माजी सैनिकांनी परिचारक यांची जीभ हासडून काढा, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
परिचारकांच्या वक्तव्याचा अनेक माजी सैनिकांनी निषेध नोंदविला. माजी सैनिक तुकाराम साळोखे म्हणाले, ‘संकटावेळी या राजकारणी लोकांना सैनिकांची आठवण होते. सरहद्दीवर लढतो. तेथे शिस्त असते. पण, सध्या राजकारणातील शिस्त बिघडल्याने सैनिकांबाबत वाईट भाषा करणाऱ्या परिचारक यांचे आमदारपद काढून घेऊन त्यांना देशातून हाकला.
माजी सैनिक कॉ. दिलीप पवार म्हणाले, ‘स्त्रीचा अपमान हा देशाचा अपमान आहे, त्यामुळे परिचारकांवर देशद्रोहाचा खटला भरावा. माजी सैनिक चंद्रहार पाटील म्हणाले, जनता सैनिकांवर जीव ओवाळून टाकते अन् हे राजकारणी स्त्रियांबद्दल वाईट बोलतात. आमच्या अब्रूला हात घालणाऱ्यांविरोधात आंदोलनाची हाक द्यावी. शिवाजीराव परुळेकर म्हणाले, स्त्री संस्कृतीचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात विधानसभेवर मोर्चा काढावा. निवृत्त पोलिस उपअधीक्षक पी. जी. मांडरे म्हणाले, फक्त निषेधाने काम होणार नाही, तर अशा बांडगुळांना धडा शिकवावा. शैलेजा भोसले म्हणाल्या, सैनिक सरहद्दीवर रक्षण करतात म्हणून आम्ही महिला येथे सुरक्षित आहोत; पण अशा महिलांवर चिखलफेक करताना परिचारकाला लाज वाटायला पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात अशोक आवटी यांनी, भारत-पाक सीमेवरील सैनिकांच्या स्थितीबाबत अनुभव सांगितले. यावेळी कर्नल देसाई, माजी सैनिक जी. एस. कांबळे यांच्यासह सुरेश कुराडे, बजरंग शेलार, सोमनाथ घोडेराव, सुनीलकुमार सरनाईक,
अ‍ॅड. रमेश कांबळे यांची भाषणे झाली. वसंतराव मुळीक, बबन राणगे, राजदीप सुर्वे, उपस्थित होते.


सोमवारी रात्री रेल्वेस्थानकावर या
महासंघाचे अध्यक्ष मुळीक यांनी, परिचारकांच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.७ मार्च) सकाळी १० वाजता त्यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी मोर्चा काढून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू, असे सांगितले. त्यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, आदी जिल्ह्यांतील माजी सैनिकांना मोर्चात सहभागी होण्याची हाक द्या, असे आवाहन केले. या मोर्चासाठी सोमवारी (दि. ६ मार्च) रात्री १० वाजता कोल्हापूर रेल्वेस्थानकावर जमावे, मध्यरात्री ११.४५च्या रेल्वेने पंढरपूरला जाण्यासाठी सज्ज व्हावे, असेही आवाहन केले.

Web Title: Smash the tongue of the hostesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.