‘अमावास्ये’च्या रात्री ‘स्मशान सहल’
By admin | Published: April 19, 2015 11:52 PM2015-04-19T23:52:17+5:302015-04-20T00:22:33+5:30
गडहिंग्लज ‘अंनिस’चा उपक्रम : ऐनापूर स्मशानभूमीची कार्यकर्त्यांकडून साफसफाई
प्रकाश चोथे - गडहिंग्लज रात्रीची शांत वेळ... नदीकाठचा निर्मनुष्य परिसर... आणि अशा वातावरणात साठ-सत्तर जणांचा कंपू एकत्र जमतो... एका बाजूला गाणी, गप्पा, माहिती असा कार्यक्रम रंगत जातो... दुसऱ्या बाजूला काट्या- कुट्याची तीन दगडांची चूल पेटून साधेच; पण रुचकर जेवण तयार होते... गप्पागोष्टींसोबत जेवणाची पंगत उठते... आणि मध्यरात्री बारानंतर कंपू आपापल्या घराकडे वळतो...!यावरून ही ‘कोजागिरी’ची सहल असेल, असाच समज प्रत्येकाचा होईल; पण... प्रत्यक्षात मात्र ही होती स्मशान सहल; तिही अमावास्येच्या रात्रीची..! गडहिंग्लज शाखेच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे या अनोख्या सहलीचे आयोजन करून ग्रामस्थांच्या मनातली भुता-खेतांविषयीची भीती समूळ नष्ट करण्यासाठी...
‘अंनिस’चे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. पी. डी. पाटील, बाळासाहेब मुल्ला, आदींनी संकल्पना मांडली, तर अॅड. दिग्विजय कुराडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यास मूर्त रूप दिले. हिरण्यकेशीच्या तीरावर स्मशानभूमीची कार्यकर्त्यांनी प्रथम साफसफाई केली. शाहीर सदानंद शिंदे यांनी शाहिरी थाटात व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाची गाणी सादर केली. थोड्याशा लांबूनच उत्सुकतेने पाहणारे काही तरुण मग बिचकतच सामील झाले. एरव्ही ज्याला हातही लावायचं धाडस करणार नाहीत, अशा चिता रचण्याच्या लोखंडी जाळीत बसून काही चिमुरड्यांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.
प्रा. बाळासाहेब मुल्ला यांनी माणसाच्या मनातल्या काल्पनिक भुतांविषयी मार्गदर्शन करून व्यर्थ भीती घालविण्याचा प्रयत्न केला. प्रा. भोईटे यांनी समाजाला आकर्षित करणाऱ्या बुवांचे ‘पाण्याचा दिवा पेटविणे’, ‘मंत्राने अग्नी पेटविणे’, ‘कागदावर भूत उमटविणे’, आदी प्रयोग सादर करून चमत्कारामागील विज्ञान सांगितले. सर्पमित्र प्रा. अनिल मगर, मेहबूब सनदी यांनी सापांविषयी मार्गदर्शन केले.
भुतांविषयी पिढ्यान्पिढ्या ऐकून ‘भुतं खरंच असतात’ या माणसाच्या विचाराला छेद देणाऱ्या ‘अंनिस’च्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक झाले. यामध्ये पा. ल. करंबळकर, डॉ. एस. के. नेर्ले, डॉ. रमेश तिबिले, तानाजी कुरळे, शिवाजी पाटील, अशोक मोहिते, उत्तम पालेकर, आदींसह ‘अंनिस’चे कार्यकर्ते आणि ऐनापूरचे ग्रामस्थ सहभागी झाले.