एसएमई लिस्टिंगसाठी कोल्हापुरातील जास्तीत जास्त कंपन्याचे प्रयत्न सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 05:18 PM2017-12-04T17:18:14+5:302017-12-04T17:27:36+5:30
भांडवल उभारणीसाठी लघु व मध्यम उद्योगांचा (एसएमई) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ‘बीएसई-एसएमई’ या स्वतंत्र व्यासपीठाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी पावले टाकत आहोत. कोल्हापुरातील जास्तीत जास्त कंपन्या एसएमई लिस्टिंग(सूचीबद्ध) व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बीएसई एसएमईचे प्रमुख अजय ठाकूर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कोल्हापूर : भांडवल उभारणीसाठी लघु व मध्यम उद्योगांचा (एसएमई) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ‘बीएसई-एसएमई’ या स्वतंत्र व्यासपीठाकडे कल वाढत आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पावले टाकत आहोत. कोल्हापुरातील जास्तीत जास्त कंपन्या एसएमई लिस्टिंग(सूचीबद्ध) व्हाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे बीएसई एसएमईचे प्रमुख अजय ठाकूर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
शेअरबाजार विषयक माहिती देण्यासाठी आयोजित कार्यशाळेनिमित्त ते कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकूर म्हणाले, बीएसई-एसएमईची सुरुवात सन २०१२ मध्ये झाली. ते देशातील पहिले एसएमई एक्सचेंज आहे. या एक्सचेंज अंतर्गत २१२ कंपन्या लिस्टिंग झाल्या आहेत.
कंपन्यांना व्यवसायातील नवीन संधी निर्माण होत असतात. त्यासह कर्जाची पुनर्रबांधणीसाठी त्यांना भांडवलाची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी उद्योजकांना त्यांची कंपनी बीएसई लिस्ट करुन आपले शेअर्स विकता येतात. त्यामुळे भांडवल उभारणीसाठी बीएसई-एसएमईकडील लिस्टिंगचा एक चांगला पर्याय आहे.
या पत्रकार परिषदेस सिद्धार्थ एज्युकेशन सर्व्हिेसेस प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष विनय भागवत, एसपी वेल्थ अॅडव्हायझर्सचे अध्यक्ष अनिल पाटील, कंपनी सेक्रेटरी अमित दाधीच, आदी उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रात परिवर्तन होईल
मुंबई, नागपूर, सूरत, अहमदाबाद कंपन्यांचा बीएसई-एसएमईमध्ये लिस्टिंग होण्यासाठी सहभाग वाढत आहे. पुण्यातील अनेक कंपन्यांची कागदोपत्री प्रक्रिया सुरू असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले, यातुलनेत आर्थिक साक्षरतेचा अभाव, शेअरबाजारची माहिती नसणे, लिस्टिंग झाल्यानंतर तक्रारी वाढतील अशा स्वरुपातील विविध भ्रमांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कंपन्या मागे आहेत. अशीच काहीशी पंजाब, दिल्लीमधील स्थिती होती. योग्य माहिती तेथील उद्योजक, कंपन्यांना मिळाल्याने त्यांचा सहभाग वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताºयामध्ये देखील अशा स्वरुपातील परिर्वतन होईल. यादृष्टीने येथे आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत.
.....................................................................................
(संतोष मिठारी)