सरकारी कार्यालयातच राजरोस धूम्रपान, तंबाखूचे सेवन; कोल्हापुरात 'इतक्या' लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 04:23 PM2023-01-02T16:23:59+5:302023-01-02T16:24:17+5:30
मानवी आरोग्यासाठी धोकादायक
समीर देशपांडे
कोल्हापूर : सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी असतानाही अनेक शासकीय कार्यालयांच्या परिसरात सर्रासपणे अधिकारी, कर्मचारी सिगारेट फुंकताना दिसत आहेत. तंबाखूची गोळी तोंडात धरूनही अनेकजण काम करत असल्याचे पाहावयास मिळते. गेल्या सहा वर्षांत अशा पद्धतीने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २ हजार २१९ जणांकडून प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे ४ लाख ८२ हजार ५७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
भारतामध्ये ५४ टक्के तंबाखूचे सेवन हे विडीच्या तर १९ टक्के सेवन हे सिगारेटच्या स्वरुपामध्ये केले जाते. भारतामधील सिगारेटमध्ये डांबर आणि निकोटिनचे प्रमाण विकसित देशांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळेच ते मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, जठर, अन्ननलिका, मुत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ शकतो.
गुटख्यामध्येही आरोग्यासाठी घातक घटक असल्यामुळे २००२ पासून महाराष्ट्रात गुटख्याला बंदी घालण्यात आली आहे. तरीही चोरून गुटखा विक्री सुरू असून यावरही अनेक ठिकाणी कारवाई होत आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत याबाबत सातत्याने जनजागरण करण्यात येत असून यासाठी काही कायदेही करण्यात आले आहेत.
कायद्याची माहिती देणारे फलक लागणार
- सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे. कलम ५ नुसार तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी आहे, कलम ६ अ नुसार १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे.
- ६ ब नुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. तर कलम ७ नुसार सर्व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टनावर ८५ टक्के भागात निर्देशित धोक्याची सूचना अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार या कायद्याची माहिती देणारे फलक शासकीय कार्यालये आणि शाळांच्या आवारात लावण्याचे काम सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे.
निष्क्रिय धूम्रपानाचाही धोका
जेव्हा एखादी व्यक्ती धूम्रपान करते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात सुमारे ३० टक्के तंबाखूचा धूर जातो. तर सुमारे ७० टक्के धूर हा वातावरणात सोडला जातो. त्याच्या आजूबाजूच्या व्यक्ती हा वातावरणातील धूर नकळत सेवन करत असतात याला निष्क्रिय धूम्रपान म्हणतात. जे धोकादायक ठरते. पालकांकडून होणाऱ्या धूम्रपानामुळे लहान मुलांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता सहा पटीने वाढते असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील दंड वसुली (डिसेंबर २०१६ ते ऑक्टोबर २०२२ मधील दंडवसुली)
विभाग | दंड वसुली | नागरिकांची |
आरोग्य विभाग | ७१,३७५ | ६२९ |
पोलिस विभाग | ३,२९,३२० | १,४८७ |
अन्न व औषध प्रशासन | ८१,८७५ | १०३ |
एकूण | ४,८२,५७० | २,२१९ |