‘युनिटी’च्या कार्यालयात धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 12:31 AM2017-06-14T00:31:23+5:302017-06-14T01:30:42+5:30

दुर्लक्ष केल्याचा आरोप : अधिकाऱ्यास कोंडले, कार्यालयास टाळे, खुर्च्यांची तोडफोड

Smudge in Unity office | ‘युनिटी’च्या कार्यालयात धुडगूस

‘युनिटी’च्या कार्यालयात धुडगूस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत म्हणून संतप्त झालेल्या ‘थेट पाईपलाईन योजना बचाव जनसमूहा’च्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी योजनेचे काम पाहणाऱ्या युनिटी कन्सल्टंटच्या पुईखडी येथील कार्यालयात घुसून धुडगूस घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘युनिटी’च्या अधिकाऱ्यास कार्यालयात कोंडले; तर खुर्च्यांची तोडफोड करीत चक्क कार्यालयास टाळे ठोकले! अनपेक्षित घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळलेले अन्य कर्मचारी बाहेर पळून गेले.
थेट पाईपलाईन योजनेबाबत २५ मे रोजी ‘युनिटी’ कन्सल्टंटचे अधिकारी राजेंद्र कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना योजनेबाबतच्या प्रश्नांसंबंधी माहिती विचारली होती. तसेच त्या अनुषंगाने सर्वसमावेशक बैठक बोलवावी, अशी मागणीही केली होती; परंतु पंधरा-वीस दिवस झाले तरी त्याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही. तसेच बैठकही आयोजित केली नाही. त्यामुळे सोमवारी (दि. १२) काही कार्यकर्ते पुईखडी येथील कार्यालयात जाब विचारण्यास गेले होते.
कार्यालयात गेल्यानंतर कुलकर्णी नावाचे अधिकारी राजीनामा देऊन निघून गेल्याचे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. त्यांच्या जागी आलेल्या राजेंद्र हासबे यांच्याशी कार्यकर्त्यांनी चर्चा केली. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करायची होती, त्याचे काय झाले? अशी विचारणा हासबे यांच्याकडे केली. त्यावेळी त्यांनी महापालिकेचे उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी ‘तुम्हीच उत्तरे द्या’ असे सांगितले आहे. ‘तुमचे वरिष्ठ कोण आहेत?’ असे विचारले असता ‘त्यांना यायला वेळ नाही’ असे हासबेंनी उत्तर दिले.
त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. उपायुक्त खोराटे यांना फोन करून बोलावून घ्या, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. खोराटे यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले. खोराटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी खुर्च्यांची तोडफोड सुरू केली. नंतर हासबे यांना कोंडून घातले आणि बाहेर कार्यालयास टाळे ठोकले. आर. के. पोवार, नामदेव गावडे, सतीश कांबळे, चंद्रकांत बराले, बाबा पार्टे, अनिल चव्हाण, किशोर घाडगे, अजित सासने, संपतराव चव्हाण-पाटील, जयकुमार शिंदे, अमित अतिग्रे, प्रकाश पांढरे, राजाराम सुतार, रियाज कागदे, आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.


खोराटे न आल्याने गोंधळ
योजना बचाव जनसमूह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘युनिटी’च्या कार्यालयात पोहोचल्यानंतर उपायुक्त विजय खोराटे यांना बोलवा, असा आग्रह धरला; परंतु खोराटे यांनी ‘युनिटी’चे अधिकारी राजेंद्र हासबे यांचा फोन घेतला नाही. वारंवार फोन करूनही त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यांनी ‘तुम्हीच काय ती उत्तरे द्या,’ असे सांगितल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी मोडतोड केली. कार्यालयास टाळे ठोकले.


ढपला पाडायला पुढे, आता मागे का?
थेट पाईपलाईन योजनेत ढपला पाडायला उपायुक्त विजय खोराटे पुढे होते. मग आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला ते आता मागे का राहतात ? असा संतप्त सवाल शिवसेनेचे किशोर घाडगे यांनी उपस्थित केला. तर ‘युनिटी’च्या वरिष्ठांना यायला वेळ नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगताच आर. के. पोवार चांगलेच खवळले. ‘आम्ही काही तुमच्या बापाचे नोकर नाही, असली उत्तरे ऐकून घेणार नाही’, असा सज्जड दम पोवार यांनी त्या अधिकाऱ्यास दिला.

Web Title: Smudge in Unity office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.