चांदी व्यावसायिकांवर तस्करीचा ठपका

By admin | Published: February 10, 2015 11:18 PM2015-02-10T23:18:44+5:302015-02-10T23:55:48+5:30

पोलिसांची दडपशाही : चांदी व्यवसायासमोर आव्हाने, देवघेवीच्या व्यवहारास कायदेशीर स्वरूप देण्याची गरज

Smuggling of silver businessmen | चांदी व्यावसायिकांवर तस्करीचा ठपका

चांदी व्यावसायिकांवर तस्करीचा ठपका

Next

तानाजी घोरपडे -हुपरी -परपेठेवरील सराफांना पोसण्यासाठी कायद्याच्या आधारे येथील चांदी व्यावसायिक आपला व्यवहार करीत नाहीत. परिणामी, आयुष्यभर मिळविलेली संपत्ती व आपला जीव पणाला लावून व्यवसायासाठी संपूर्ण देशभर भटकंती करावी लागत आहे.
पोलिसांच्या दडपशाहीच्या धोरणामुळे प्रामाणिक चांदी व्यावसायिकांवरती ‘चांदी तस्कर’ म्हणून पोलीस शिक्का मारून मोकळे होत आहेत. व्यवसायासमोरील अशा प्रकारचे आव्हान दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. बदलत्या काळानुसार व्यवहारात योग्य ते बदल करून देवघेवीच्या व्यवहारास कायदेशीर स्वरूप कसे देता येईल, याबाबत व्यावसायिकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. तसेच व्यावसायिक स्पर्धेमुळे दिवसेंदिवस रुंदावत चाललेली दरी संपुष्टात आणून व्यावसायिक वृद्धी व हित जोपासण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
परपेठेतील तसेच स्थानिक सराफांकडून कच्ची चांदी घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे दागिने तयार करणे व ते पोहोच करणे हा हुपरी परिसरातील आठ ते दहा गावांतील व्यावसायिकांचा मुख्य व्यवसाय आहे. सराफांच्या मागणीनुसार तयार झालेले दागिने घेऊन व्यावसायिक देशभरातील सर्व बाजारपेठेवर जात असतात. त्यांना चोरापेक्षा जनतेचे रक्षक म्हणून घेणाऱ्या प्रत्येक प्रांतातील पोलिसांचीच भीती जास्त सतावत असते. व्यवसायात लाखो रुपयांची व शेकडो किलो कच्चा चांदीची उलाढाल होत असते. मात्र, कोणत्याही प्रकारचा कायदेशीर कागदपत्रांचा आधार घेतला जात नाही. व्यावसायिक व सराफ यांच्यातील विश्वासाच्या नातेसंबंधावरच व्यवहार करण्यात येतो, असे व्यवहार पिढ्यान्पिढ्या सुरू आहे. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांपासून वाटेत कुठेही अडवून पोलिसांकडून तपासणी केली जाते. त्याच्याजवळ असणारी व्यवसायाच्या कागदोपत्रांची दखलही न घेता चांदीचे दागिने चोरीचे आहेत, असे भासवून अटक करण्याची धमकी देत ‘चांदी तस्कर’ असल्याचा शिक्का मारला जातो. गावापासून हजारो मैल दूर गेलेल्या व्यावसायिकाला अशावेळी कोणाचाही आधार मिळत नाही. जानेवारी महिन्यामध्येच तमिळनाडू राज्यातील सेलमला कच्ची चांदी घेऊन जाणाऱ्या व्यावसायिकांना बेळगाव पोलिसांनी अडवून त्यांच्याजवळील चांदी ताब्यात घेऊन चांदी तस्कराचा शिक्का मारून मोकळे झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे अनेक व्यावसायिक भयभीत झाल्याचे पाहावयास मिळत आहेत. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी कायद्याचा आधार घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यासाठी येथील व्यावसायिकांनीही आपले संपूर्ण व्यवहार कायद्याच्या चौकटीत राहूनच करण्याची गरज आहे. केवळ परपेठेवरील सराफांना पोसण्यासाठी कायदा धाब्यावर बसवून व्यवहार करणे टाळले पाहिजे. सराफांशी व्यवहार करताना तो विश्वसनीय कसा होईल, याबाबतची काळजी घेतली पाहिजे.

उपाययोजना शोधण्याची गरज
गेल्या पाच-सहा वर्षांपासूनच सर्वच उद्योगांमधील जागतिक मंदीमुळे हतबल होण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. यातून रौप्यनगरीचा चांदी उद्योगही सुटलेला नाही.


चांदीच्या दरातील चढ-उताराचे प्रमाण चांदी व्यवसायाच्या सुमारे सव्वाशे वर्षांच्या कालावधीतही पाहावयास मिळालेले नाही, अशी जीवघेणी परिस्थिती पाहावयास मिळत आहे.


तसेच दिवसेंदिवस व्यावसायिक स्पर्धेमुळे चांदी व्यावसायिकांमध्ये रुंदावत चाललेली दरी मिटवून व्यवसायासमोर निर्माण झालेली आव्हाने व समस्यांवर मात करण्याच्या उपाययोजना शोधण्याची गरज निर्माण
झाली आहे.

Web Title: Smuggling of silver businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.