स्नेहल बेंडके करणार ‘कॉमनवेल्थ’मध्ये पंचगिरी-पहिली भारतीय महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:59 AM2018-03-27T00:59:31+5:302018-03-27T00:59:31+5:30
कोल्हापूर : येथील आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच स्नेहल विद्याधर बेंडके हिची आॅस्ट्रेलियात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स् (राष्ट्रकुल स्पर्धा) सन २०१८ मध्ये बास्केटबॉल पंच म्हणून निवड झाली आहे.
कोल्हापूर : येथील आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच स्नेहल विद्याधर बेंडके हिची आॅस्ट्रेलियात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स् (राष्ट्रकुल स्पर्धा) सन २०१८ मध्ये बास्केटबॉल पंच म्हणून निवड झाली आहे. जागतिक बास्केटबॉल महासंघाकडून तिची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड होणारी स्नेहल ही पहिली भारतीय महिला पंच ठरली आहे. या निवडीमुळे कोल्हापूरचा सन्मान झाला आहे.
याबाबतची माहिती बास्केटबॉल पंच स्नेहल हिने सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ती म्हणाली, आॅस्ट्रेलियातील गोल्ड कॉस्ट येथे ५ ते १५ एप्रिलदरम्यान कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. यासाठी जागतिक बास्केटबॉल महासंघाकडून जगातून एकूण २४ पंचांची निवड झाली आहे. त्यात नऊ महिला असून त्यामध्ये माझा समावेश आहे. गेल्या चार वर्षांमध्ये विविध स्पर्धांमधील पंच म्हणून केलेल्या कामगिरीची दखल घेत महासंघाने माझी ‘कॉमनवेल्थ’साठी निवड केली. या निवडीची प्रक्रिया पाच महिन्यांची होती. या स्पर्धेत महिला गटांतील स्पर्धेसाठी मी पंच म्हणून काम पाहणार आहे. आजपर्यंत आपल्या देशातून बास्केटबॉल या क्रीडा प्रकारात महिला पंच म्हणून कॉमनवेल्थ गेम्स्मध्ये कोणीही मजल मारू शकलेले नाही. हा सन्मान मला मिळाला आहे.
या निवडीमुळे आपल्या देशाला अधिकृतरित्या पंच म्हणून प्रतिनिधीत्व मिळाले आहे. या निवडीबाबतचे यश हे जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि नियमित सरावामुळे मिळाले आहे. आजपर्यंतच्या माझ्या यशात आई-वडिलांसह भारतीय बास्केटबॉल महासंघ, राज्य बास्केटबॉल संघटनेचे पदाधिकाºयांचे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरले आहे.
या पत्रकार परिषदेस वृंदा बेंडके, वैजयंती दळी, ऐश्वर्या मुनिश्वर, स्वरूपा शेटे, वासुदेव कुलकर्णी उपस्थित होते.
विविध स्पर्धांमध्ये पंच म्हणून कामगिरी
जागतिक स्पर्धेत पंच म्हणून गेल्या नऊ वर्षांपासून स्नेहल कार्यरत आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा श्रीगणेशा सन २००९ मध्ये चेन्नई येथील वरिष्ठ महिला अशिया वुमेन चॅम्पियनशिपने झाली. त्यात सन २०१२ मध्ये लंडन येथील आॅलिम्पिक गेम्स्मधील वुमेन सेमीफायनलमध्ये पंच म्हणून काम करणारी ती पहिली भारतीय बास्केटबॉल पंच ठरली. अशिया सिनियर मेन्स् कप आणि अशिया चॅम्पियन कप या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तिची निवड झाली होती. या स्पर्धेसाठी निवड झालेली ती ‘पहिली एशिया महिला पंच’ होती. ‘सिनीअर वुमेन वर्ल्ड चॅम्पियनशिप’साठी दोनवेळा तिची निवड झाली. सर्व वयोगटांतील एशिया पातळीवरील बास्केटबॉल पुरुष व महिला स्पर्धेमध्ये अकरा वेळा अंतिम सामना करणारी ती एकमेव भारतीय बास्केटबॉल पंच आहे.
इनडोअर कोर्टसाठी शासनाने मदत करावी
महासंघाकडून झालेल्या निवडीमुळे मी खूप खूश आहे. बास्केटबॉलमध्ये कोल्हापुरातील महिला खेळाडूंचे प्रमाण वाढत आहे. त्याला बळ देण्यासाठी काही योजना मी नियोजित केल्या आहेत. याअंतर्गत असलेल्या इनडोअर कोर्टसाठी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा स्नेहल हिने व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आणि पंच म्हणून काम करणाºया महिलांचे प्रमाण वाढत आहे.