कोल्हापूरचे गिर्यारोहक करणार हिमचढाई
By admin | Published: May 25, 2016 01:08 AM2016-05-25T01:08:05+5:302016-05-25T01:10:54+5:30
एक जूनपासून प्रारंंभ : मलय अॅडव्हेंचर्सतर्फे तेरा हजार फुटावरील शिखर मोहीम
कोल्हापूर : मुंबईतील मलय अॅडव्हेंचर्सतर्फे आयोजित देवतिब्बा व नोरबू या हिमशिखर मोहिमेत खुशी कांबोज (वय १४), प्रसाद आडनाईक (२३) व शिवतेज पाटील (१९) हे तीन युवा गिर्यारोहक कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणार करणार आहेत.
नवीन गिर्यारोहक तयार व्हावेत या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ दिवस चालणाऱ्या या मोहिमेची सुरुवात दि. १ जूनपासून होत आहे.
हिमाचल प्रदेशात मनालीपासून काही अंतरावर असणाऱ्या जगतसुख व्हॅलीमधून देवतिब्बा या मोहिमेची सुरुवात होते. जगतसुख-सेरी-चिक्का असा तीन दिवसांचा ट्रेक करुन समुद्रसपाटीपासून तेरा हजार फूट उंचीवर चंद्रताल येथे बेसकॅम्प सेट करण्यात येईल. त्यानंतर चौदा हजार आठशे फूट उंचीवरील अॅडव्हान्स बेस कॅम्प हा या मोहिमेतील सर्वांत आव्हानात्मक टप्पा पार केला जाईल. त्यानंतर वेगवेगळ्या उंचीवर बेस कॅम्प सेट करीत ही मोहीम पार करण्यात येईल.
गेल्यावर्षी खुशीने क्षीतीधार व हनुमान तिब्बा या मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्याने तिची देवतिब्बा मोहिमेसाठी निवड झाली आहे. ती या मोहिमेत यशस्वी झाल्यास देबतिब्बा समीट करणारी सर्वांत लहान गिर्यारोहिका ठरणार आहे तसेच या मोहिमेत सहभागी होणारे प्रसाद व शिवतेज हे नोरक हिमशिखरावर आरोहण करणार आहेत.
या मोहिमेतील सर्व टीमसाठी गेल्या दोन महिन्यांपासून लोणावळ्याजवळील ठाकभैरी व रांगणा किल्ला परिसरात सराव शिबिरे घेण्यात आली.
महिबूब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून वेस्टर्न माउंटन स्पोर्टस्चे अध्यक्ष विनोद कांबोज, हिल रायडर्स अॅन्ड हायकर्स ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील, परेश चव्हाण हे तिन्ही गिर्यारोहकांना मार्गदर्शन करत आहेत. या मोहिमेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)