...तर म्हाकवेतील अतिक्रमणावर हातोडाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:48+5:302021-04-08T04:25:48+5:30
म्हाकवे : म्हाकवे (ता.कागल) येथील बसस्थानक परिसरातील त्या सोळा जणांना वारंवार विनंती करूनही त्यांनी आपली अतिक्रमणे हटविलेली नाहीत. त्यामुळे ...
म्हाकवे : म्हाकवे (ता.कागल) येथील बसस्थानक परिसरातील त्या सोळा जणांना वारंवार विनंती करूनही त्यांनी आपली अतिक्रमणे हटविलेली नाहीत. त्यामुळे आता ग्रामपंचायतीने आक्रमक पवित्रा घेत कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी येथील अतिक्रमणे काढून घेण्यासाठी टपरीधारकांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देत नोटिसा दिल्या आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून येथील अतिक्रमणाचा मुद्दा गाजत आहे. याबाबत धोकीधारक आपल्या व्यवसायावर कुऱ्हाड येऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे हेलपाटे मारत आहेत.
मुख्यमंत्री सडक योजनेतून म्हाकवे ते कुरणी या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम सुरू आहे. कार्यकारी अभियंत्याकडून रस्त्याच्या बाजूला झालेल्या अतिक्रमणाबाबत लेखी कळविले होते, तसेच रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणारी झाडे तोडण्यास वनक्षेत्रपाल करवीर यांनी परवानगीही दिली असल्याचे सरपंच चौगुले यांनी सांगितले.
नोटीसवर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्या आहेत.
तर पर्यायी जागाही मिळणार...
१५ दिवसांत स्वतःहून टपरी हलविणाऱ्यांना पर्यायी जागा देऊ. मात्र, त्यानंतर पर्यायी जागा नाहीच, शिवाय कायदेशीर मार्गाचा अवलंब करून या टपऱ्या हलविण्यात येतील. यावेळी होणाऱ्या नुकसानीलाही संबंधित जबाबदार राहतील, असा इशाराही दिला आहे.
खोकीधारकांची बैठक घेतली होती. मात्र, आम्ही खोकी काढून घेणार नसल्याचे सांगत आडमुठी भूमिका मांडली. त्यामुळे ग्रामपंचायतीला नाइलाजास्तव कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.
-सुनीता महादेव चौगुले
सरपंच, म्हाकवे.