जागे व्हा, नाही तर अस्थी कलश मंत्रालयात ठेवू, शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:25 AM2022-05-16T11:25:19+5:302022-05-16T11:28:32+5:30
बीडमधील नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने उसाचा फड पेटवून आत्महत्या केली होती. त्यांचा अस्थींचे पंचगंगा घाटावर विसर्जन करण्यात आले.
कोल्हापूर : अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर सरकार अजूनही जागे होणार नसेल तर अस्थिकलश थेट मंत्रालयात आणून ठेवू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. बीडमधील नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने उसाचा फड पेटवून आत्महत्या केली होती. त्यांचा अस्थिकलश काल, रविवारी दुपारी कोल्हापुरात आला. नर्सरी बागेत शाहू समाधीस्थळी अभिवादन करून कलशातील अस्थींचे पंचगंगा घाटावर विसर्जन करण्यात आले. शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा संघटना, मराठा महासंघ, मल्हार सेना, जय शिवराय शेतकरी संघटनेने यात सहभाग घेतला.
राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. लाखो टन ऊस शेतात तसाच ठेवून कारखाने बंद झाले आहेत. या उसाचे करायचे काय, असा प्रश्नाने शेतकरी हतबल झाला आहे. तरीही सरकारला याकडे बघायला वेळ नाही. मशीद, भोंगे, मंदिर या प्रश्नात सरकार अडकून पडले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणीही पाहायला तयार नाही, या उद्विग्नतेतून नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर तर शेतकऱ्यांत संतापाची भावना आहे. त्यांचा अस्थिकलश राज्यभर फिरवला जात आहे. रविवारी हा कलश कोल्हापुरात आला.
यावेळी शिवाजीराव माने, संपतराव पवार पाटील, बाबासो देवकर, बबन रानगे, वसंतराव मुळीक या कोल्हापुरातील नेत्यांबरोबरच यवतमाळचे सिकंदर शाह, परभणीचे माणिक कदम, कराडचे पंजाबराव पाटील, बी.जी. पाटील, विनायक पाटील यांनी पंचगंगा घाटावर जाऊन अस्थींचे विसर्जन केले. दरम्यान, सोमवारी कराडला प्रीतिसंगमावर अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.