..म्हणून माजी मंत्री हसन मुश्रीफांनी घेतल्या दोन म्हैशी, शेतकऱ्यांनाही केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 04:47 PM2022-08-16T16:47:58+5:302022-08-16T16:49:27+5:30
..त्यांना उत्तर द्यायचे असेल तर म्हैशीचे दूध उत्पादन वाढ करावीच लागेल
कागल : महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामविकास आणि कामगार मंत्रिपदाची यशस्वीपणे धुरा सांभाळलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी दोन नव्या मुऱ्हा जातीच्या म्हैशी खरेदी केल्या. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघात आयोजित कार्यशाळेत गोकुळ दूध संघाच्या संचालक व कर्मचाऱ्यांना दूध उत्पादन वाढीसाठी नवीन म्हशी घेण्याचे व त्याची सुरुवात स्वतःपासूनच करण्याचे आवाहन मुश्रीफ यांनी केले होते. या उपक्रमाची सुरुवात मुश्रीफांनी स्वतःपासून सुरु करत दोन नवीन म्हैशी घेतल्या.
मुश्रीफ यांनी या दोन म्हैशी खरेदी केल्यानंतर त्यांच्या गोठ्यात दहा म्हैशी झाल्या आहेत. या म्हैशींचे स्वागतही त्यांनी केले. त्यांनी म्हैशी खरेदी करून म्हैस दूध उत्पादन वाढविण्याचे आवाहन यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व दूध उत्पादकांना केले.
आमदार मुश्रीफ म्हणाले की, अमूल दूध संघाने नाशिकमध्ये नुकतीच ८५० एकर जमीन घेतलेली आहे. तिथे ते म्हशीचा प्रकल्प उभारणार आहेत. तिथे उत्पादित म्हैशीचे दूध मुंबई बाजारात आणून गोकुळचे मार्केट ताब्यात घेण्याचा त्यांचा डाव आहे. अमूलसारखा एवढा मोठा प्रकल्प आम्ही उभा राहू शकत नाही. परंतु; त्यांना उत्तर द्यायचे असेल तर म्हैशीचे दूध उत्पादन वाढ करावीच लागेल. गोकुळच्या दूध उत्पादकांची संख्या पाच लाखावर आहे. त्यापैकी चौथाई म्हणजे सव्वा लाख शेतकऱ्यांनी फक्त एक -एक म्हैस जरी घेतली तरी अमूलचे आव्हान परतवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.