..त्यामुळे ते माझे नाव घ्यायला विसरले असतील, हातकणंगलेतील उमेदवारीवरुन संजय पाटलांनी धनंजय महाडिकांचा काढला चिमटा
By विश्वास पाटील | Published: March 27, 2024 06:50 PM2024-03-27T18:50:25+5:302024-03-27T18:52:14+5:30
या मतदारसंघात माझा संपर्क असून भाजपच्या उमेदवारीचा प्रबळ दावेदार असल्याचा दावा
कोल्हापूर : हातकणंगलेलोकसभा मतदारसंघातून इच्छुक म्हणून माझे नाव घेण्यास खासदार धनंजय महाडिक हे कार्यबाहुल्यामुळे विसरले असतील, असे सांगत या मतदारसंघातून भाजपकडून आपण प्रबळ दावेदार असल्याचा दावा मयूरचे डॉ. संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.
डॉ. पाटील म्हणाले, हातकणंगलेलोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी भूमिका आम्ही भाजपच्या राज्य नेतृत्वाकडे सातत्याने मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही आम्ही त्यासाठी आग्रह धरला व हा मतदारसंघ भाजपसाठी पोषक असल्याचे सांगितले; परंतु त्यांनी हा मतदारसंघ भाजपला मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात आमच्या घरी भेट दिली तेव्हाही तुम्ही या मतदारसंघाबाबत आग्रह धरू नका, तो मिळण्याची एक टक्काही खात्री नसल्याचे स्पष्ट केले; परंतु त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपकडे येईल, अशी भावना खासदार महाडिक यांनी व्यक्त केली व शौमिका महाडिक त्या जागेवर लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले. खासदार महाडिक कार्यबाहुल्यामुळे या मतदारसंघातून मीही लढण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यास विसरले असावेत.
या मतदारसंघात यापूर्वी मी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आहे. सुमारे साडेतीन लाख मते त्यावेळी मिळाली होती. या मतदारसंघात माझा संपर्क असून भाजपच्या उमेदवारीचा प्रबळ दावेदार असल्याचा दावा डॉ. पाटील यांनी केला आहे.