...तर आम्ही सरकारची गंमत करू

By admin | Published: October 12, 2015 10:50 PM2015-10-12T22:50:20+5:302015-10-13T00:09:11+5:30

राजू शेट्टी यांचा इशारा : ऊस उत्पादकांना पहिली उचल घसघशीत मिळाली पाहिजे

... so we will kick off the government | ...तर आम्ही सरकारची गंमत करू

...तर आम्ही सरकारची गंमत करू

Next

आजरा : कायद्यानुसार एफआरपीची उचल एकरकमी न देता ती तीन तुकड्यांत देण्याचा डाव साखर कारखानदारांनी चालवला आहे. अशावेळी सरकारने एकीकडे एफआरपी कायद्यानुसार उचल द्यावी, असे म्हणत असतानाच एफआरपीच्या धोरणात बदल करण्याची भाषा सुरू करून शेतकऱ्यांची गंमत करून केवळ बघ्याची भूमिका घेत असेल व संशयास्पद वागत असेल, तर सरकारची आम्हीही गंमत करू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
१६ आॅक्टोबरला साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आजरा येथे आयोजित स्वाभिमानीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांची एकंदर अवस्था पाहता ऊस उत्पादकांना घसघशीत पहिली उचल मिळण्याची गरज आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे महाराष्ट्रात यंदा सुमारे २० लाख टन साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढत आहेत. असे असूनही कारखानदार मंडळी सरकारच्या मदतीकडे लक्ष देऊन आहेत. कारखानदारांना पैसे देणे म्हणजे दारूड्याला पैसे देण्यातला प्रकार आहे. मुळात कारखान्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
प्रा. जालंदर पाटील म्हणाले, उसाचे गणित राजू शेट्टी यांनी मांडले. कारखानदारांनी कारखाने लुटून स्वत:ची घरे भरण्यापलीकडे काहीही केले नाही. अनुकंपा तत्त्वावरचे नेते विधानसभेत पाठविण्यापेक्षा स्वाभिमानीचा एखादा चेहरा विधानसभेत पाठवा, असे आवाहनही केले.
यावेळी राजू गड्यान्नावर, तानाजी देसाई, कृष्णा पाटील, आबासाहेब पाटील, नारायण सावंत, विनायकराव देसाई, सखाराम केसरकर, नंदकुमार सरदेसाई, निवृत्ती कांबळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)


विद्यमान आमदारांना आजरा, बिद्री व भोगावती साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी काहीही देणे-घेणे नाही, असा टोला प्रा. जालंदर पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना लगावला.


शेतकऱ्यांच्या पैशाचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहणार नाहीत. शेतकऱ्यांची कारखानदारांनी थट्टा करू नये, असे खासदार शेट्टी यांनी सुनावले. १६ तारखेचा मोर्चा प्रचंड संख्येने उपस्थित राहून विक्रमी करावा, असे शेतकऱ्यांना आवाहन केले.

Web Title: ... so we will kick off the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.