तर मग घरातले कोरोना रुग्ण ठेवायचे कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:23 AM2021-05-14T04:23:03+5:302021-05-14T04:23:03+5:30
कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घरामध्ये ठेवू नका, अशी सूचना कोरोनाविषयक राज्यस्तरीय ...
कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घरामध्ये ठेवू नका, अशी सूचना कोरोनाविषयक राज्यस्तरीय टास्क फोर्सने केल्यानंतर आता जिल्ह्यात सध्या सात हजार ७७२ रुग्ण ठेवायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामध्ये शहरामधील दोन हजार ११७ गृह अलगीकरणामध्ये असून, बारा तालुक्यांतील पाच हजार ६५५ रुग्ण घरामध्ये राहत आहेत.
टास्क फोर्सचे निरीक्षण असे की, जरी कमी लक्षणे असलेले रुग्ण असले तर त्यांना रुग्णालयाऐवजी घरामध्येच अलगीकरणात ठेवण्यात येते. ज्या ठिकाणी स्वतंत्र खोली आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे, याच ठिकाणी गृह अलगीकरण करावे अशा सूचना आहेत; परंतु रुग्णालयात जाण्यापेक्षा घरीच राहिलेले बरे म्हणून थोडी जर सोय असली तरी फारशी लक्षणे नसलेले घरीच राहत आहेत. परंतु घरामध्ये प्रत्येक वेळी शिस्त पाळलीच जाते असे नाही, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
घरातील एखाद्या व्यक्तीला जरी लागण झाली आणि ती व्यक्ती घरात राहत असेल तर आठवड्याभरात घरातील सर्वजण बाधित झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह नागरिकांची संख्या वाढत आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांत ही परिस्थिती आढळल्यामुळे टास्क फोर्सच्या सदस्यांनी कोल्हापुरातही गृह अलगीकरणाची सुविधा बंद करा. पाॅझिटिव्ह नागरिक संस्थात्मक अलगीकरणामध्ये राहू देत, मात्र घरात नकोत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
चौकट
घरात राहण्याने असे वाढतात रुग्ण
घरातील कर्ता पुरुष जो कामावर जावून येतो, तो पॉझिटिव्ह आला की गंभीर लक्षणे नसल्याने घरीच राहतो; परंतु म्हणावी तशी दक्षता घेतली जात नाही. त्यातूनच पत्नी पॉझिटिव्ह येते. दोघेही रुग्णालयात दाखल होतात; परंतु घरातील मुले आजी, आजाेबांकडे राहू लागतात. या मुलांकडून या दोन्ही वृद्धांना कोरोनाची लागण होते. आधीच या दोघांचे वय झालेले. प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांच्यावर उपचाराची वेळ येते. तीन, चार दिवसांनी मुले पॉझिटिव्ह येतात आणि मग संपूर्ण घरच पॉझिटिव्ह येते. हे वर्तुळ खंडित करण्यासाठी रुग्णांना घरात ठेवू नका, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
चौकट
कोल्हापूर महापालिकेने सुमारे १२०० रुग्णांना दाखल करण्याची सध्या सोय केली आहे. बाराही तालुक्यांसह सर्व प्रकारच्या रुग्णालयांमध्ये साडेपाच हजार रुग्णांची सोय होत आहे. अशा परिस्थितीत घरात राहणाऱ्या सात हजार ७७२ रुग्णांना जर घरामध्ये ठेवायचे नसेल तर गावागावांत गेल्या वर्षीसारख्या शाळा ताब्यात घेऊन त्यांची सोय करण्याची गरज आहे. शहरामध्येही सांस्कृतिक सभागृहांमध्ये पॉझिटिव्ह लक्षणे नसलेल्या नागरिकांची सोय करण्याची गरज आहे.
चौकट
मोठी यंत्रणा उभी करावी लागणार
जर या सर्व रुग्णांना घरातून बाहेर आणून त्यांची इतरत्र सोय करायची असेल तर त्याचा मोठा ताण आरोग्य यंत्रणेवर पडणार आहे. गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागापासून सर्व विभागांना कामाला लावून ही यंत्रणा उभी करण्यात आली होती; परंतु जिल्हा परिषदेने औषधे, मास्क व इतर साहित्यासाठी खर्च केलेले ३५ कोटी रुपये अजूनही येणे असल्याने हे धाडस कोणी करायचे, हा खरा प्रश्न आहे.