मग गावांच्या विकासाला निधी आणणार कोठून..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:56+5:302021-07-21T04:17:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वेगवेगळ्या प्रकारच्या खर्चाचा सगळाच भार पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर टाकू नका, नाही तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वेगवेगळ्या प्रकारच्या खर्चाचा सगळाच भार पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर टाकू नका, नाही तर गावच्या विकासालाच निधी मिळणार नाही, अशी भीती जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी सभेत व्यक्त करण्यात आली. राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले, वीज बिले, पाणी योजना बिले, कोरोनासाठीचा खर्च वित्त आयोगाच्या निधीतून करण्याच्या ग्रामविकास विभागाने सूचना दिल्या आहेत. हा सगळा खर्च यातून केला तर मग गावातील विकासकामांसाठी निधी कुठून मिळणार याचा विचार करा आणि शासनाकडे तशी मागणी करा. या वेळी इंगवले यांनी बांधकाम विभागाच्या रखडलेल्या कामाच्या आदेशावरून प्रभारी कार्यकारी अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली. या वेळी शाब्दिक चकमक उडाली.
सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी संभाव्य महापुरावेळी शिरोळ तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटतो. याचा विचार करून कवठे गुलंदच्या माळावर कोविड सेंटर उभारावे, अशी सूचना केली. पावसाळ्याचा विचार करून नादुरुस्त आणि धोकादायक असणाऱ्या डीपी बदलण्याची सूचना बांधकाम समिती सभापती वंदना जाधव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. कागल तालुक्यातील विजेच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांना तातडीने मदत मिळावी, अशी सूचना या वेळी अध्यक्ष पाटील यांनी केली. या वेळी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, सभापती रसिका पाटील, शिवानी भोसले, कोमल मिसाळ यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते.
चौकट
यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यासाठी क्रेनच आणावी लागते. जे प्रत्येकवेळी शक्य नाही असा मुद्दा मांडला होता. याची दखल घेत अध्यक्ष राहुल पाटील यांनी पाठीमागच्या बाजूने जिना करण्याच्या सूचना या वेळी बांधकाम विभागाला दिल्या.
चौकट
शिक्षक संघटनांसोबत चर्चा
सुगम आणि दुर्गमबाबत काही शिक्षक संघटनांच्या तक्रारी आहेत. तेव्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याआधी सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि संघटना प्रतिनिधी यांनी एकत्र बसून यातून मार्ग काढूया, अशी सूचना उपाध्यक्ष शिंपी यांनी या वेळी केली.