रक्षाबंधनाच्या सणाने सामाजिक वीण घट्ट

By admin | Published: August 19, 2016 12:24 AM2016-08-19T00:24:16+5:302016-08-19T00:36:34+5:30

शहरात अपूर्व उत्साह : संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयांचा सहभाग

The social burden tightened during the ritual festival | रक्षाबंधनाच्या सणाने सामाजिक वीण घट्ट

रक्षाबंधनाच्या सणाने सामाजिक वीण घट्ट

Next

कोल्हापूर : भावा-बहिणीच्या नात्याचा बंध चिडीला आणणारी टिंगल, लवंगीसारखी फुटणारी दीड मिनिटांची भांडणे, एखादी टप्पल आणि डबडबलेल्या डोळ्यांनी टाकलेला मायेचा कटाक्ष यांनी बांधलेला असतो. या सगळ्या भावनांचा बंध बहिणीने राखीच्या रूपाने भावाच्या मनगटावर बांधला आणि भावाने तिला रक्षणाची ग्वाही देत रक्षाबंधन हा सण गुरुवारी साजरा करण्यात आला.
बहीण-भावाच्या नात्याला प्रेम, भांडण, रुसवे-फुगवे असे भावभावनांचे पदर असतात. प्रेमाचा तो बंध असतो. ‘राखीच्या या बंधनास जपावे निरामय भावनेने, जसे जपले हळुवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने’ असे म्हणत बालपणापासूनची साथ प्रेमाच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणारा हा सण कोल्हापूरकरांनी उत्साहात साजरा केला. कुर्ता घालून व डोक्यावर टोपी ठेवून पाटावर बसलेल्या भावाला बहिणीने राखी बांधली, त्याचे औक्षण केले आणि भावाने तिच्या सदैव पाठीशी राहण्याची हमी देत, आकर्षक भेटवस्तू देऊन तिला खुष केले. अनेकविध सौंदर्याने नटलेल्या या राख्या हातावर मोठ्या अभिमानाने बांधून घेऊन मिरवतच भाऊ घरातून बाहेर पडले. लहान मुलांपासून घरातील कर्ते पुरुष ते वृद्ध आजोबांपर्यंत प्रत्येकाच्या मनगटावरची राखी खुलून दिसत होती. बहीण-भावाच्या रक्ताच्या नात्याबरोबरच मानलेल्या नात्यांनाही मोलाचे स्थान आहे. त्यामुळे शहरातील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडसह विविध संस्थांतर्फे रक्षाबंधन साजरा करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. धनंजय पठाडे, डॉ. मुरलीधर डोंगरे, प्रमिला जरग, द्वारकानाथ जरग उपस्थित होते. (प्रतिनिधी)

बंदी बाधवांना बहिणीची माया...!
कोल्हापूर : बिंदू चौकातील उपकारागृहातील बंदीजनांना शहाजी लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनींनी राखी बांधून बहिणीची माया दिली. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश आर. एस. निंबाळकर होत्या. यावेळी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एम. टाकळीकर, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एस. देशमुख, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव यू. जे. मोरे, प्रा. डॉ. सविता रासम, पल्लवी कोरगावकर, अ‍ॅड. के. आर. खटावकर, अ‍ॅड. निखिल इनामदार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी १२९ बंदीबांधव व २२ तुरुंग कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. बंदीबांधवांतर्फे प्रा. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी देशमुख, जिल्हा न्यायाधीश निंबाळकर, सचिव मोरे तुरुंगाधिकारी प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. एस. व्ही. मुक्तामठ यांनी आभार मानले.


भागीरथी संस्थेने साजरे केले अनोखे रक्षाबंधन
कोल्हापूर : भागीरथी महिला संस्थेने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलिसांना तसेच बंदीजनांना राख्या बांधल्या. यावेळी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, साहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस निरीक्षक युवराज आठरे, डी. के. पवार, संस्थेच्या अश्विनी वास्कर, प्रिया चिवटे, प्रिती खोत, चंद्रकला सिद्धनेर्ली, संध्या साळी, सुनीता जोशी उपस्थित होत्या. यावेळी कारागृह अधीक्षक शरद शेळके, तुरुंग अधिकारी चंद्रकांत आवळे, हरिश्चंद्र जाधव, आर. एस. जाधव उपस्थित होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्यावतीनेही कैद्यांना राखी बांधण्यात आली.+

]बहिणींसोबत सेल्फी
रक्षाबंधन सण सोशल मीडियावरही तितक्याच उत्साहाने साजरा झाला. दिवसभर व्हॉट्स अ‍ॅपवर बहीण-भावाच्या नात्याची महती सांगणारे संदेश फिरत होते. अनेक ग्रुपवर भावांनी बहिणींसोबतची सेल्फी शेअर केली. काहीजणांनी राखी बांधतानाचे छायाचित्र पोस्ट केले. याशिवाय ‘बहीण हवी असेल तर स्त्री-भू्रण हत्या रोखा, मुली वाचवा’ असा सामाजिक संदेशही देण्यात आला.
सखी संघटनेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम
कोल्हापूर : वारांगनांसाठी कार्यरत असलेल्या सखींनी रक्षाबंधनानिमित्त गुरुवारी आपल्या भावांना धागा बांधला. लक्ष्मीपुरीतील सखी संघटनेच्या कार्यालयात सायंकाळी हा कार्यक्रम झाला. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या सखींकडून राखी बांधून घेतली.
‘रेशीम धागा गुंतला धागा, आठवण येते भाऊराया’ हे ब्रीदवाक्य या सखींनी तयार केले होते. सखी संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव यांच्या नेतृत्वाखाली रक्षाबंधन साजरे करण्यात आले. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष राजू वायदंडे, शहराध्यक्ष धनाजी सकटे, युवा उपाध्यक्ष प्रवीण आजगेकर यांच्या हातात या वारांगनांनी राखी बांधली. या भावांनी भारतीय संविधानाची प्रत या सखींना भेट म्हणून दिली. सुमारे तासभर हा कार्यक्रम झाला. यावेळी संगीता पाटील, जयश्री शीतलगीरी यांच्यासह वारांगना उपस्थित होत्या.

बालकल्याण संकुलात उत्साह
मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेतील कन्या निरीक्षणगृह, कन्या बालगृह, महिला आधारगृह या विभागांतील मुलींनी संस्थेतील अनाथ, निराधार बालकांना राख्या बांधून त्यांच्याप्रती आपले बंधुप्रेम व्यक्त केले. यावेळी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, विमला गोयंका स्कूल, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, कळंबा गर्ल्स हायस्कूल, ब्लूमिंग बड्स स्कूल, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूल, जयभारत शिक्षण संस्था, डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर, केएमसी कॉलेज, विवेकानंद कॉलेज, भारत स्काऊट गाईड, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, शंकरराव चव्हाण विद्यामंदिर, पुनाळ;अजिंक्य युवा शक्ती, इनरव्हील क्लब आॅफ रोटरी महिला शाळा व संस्थांच्या विद्यार्थिनींनी मुलांना राख्या बांधल्या.

Web Title: The social burden tightened during the ritual festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.