शिवाजी विद्यापीठात सामाजिक चिकित्सालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:24 AM2021-03-15T04:24:09+5:302021-03-15T04:24:09+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र अधिविभागाच्यावतीने सामाजिक चिकित्सालयाचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी कुलगुरू डॉ. ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र अधिविभागाच्यावतीने सामाजिक चिकित्सालयाचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याहस्ते करण्यात आले. या विभागाने राबविलेल्या उपक्रमाची समाजाला नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय क्षेत्रात ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि योग या चार स्तरांवर समाजातील व्यक्तीच्या शारीरिक व्याधी कमी करण्यासाठी कार्यरत आहेत. असे असले तरी विविध व्यक्तिगत आणि कौटुंबिक प्रश्नांमुळे अनेक मानवनिर्मित व्याधी निर्माण होतात. सामाजिक नातेसंबंध अतिशय संवेदनशील असतात. त्यातील गुंता हळुवारपणे सोडविण्यासाठी हे चिकित्सालय उपयुक्त ठरेल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
व्याधीग्रस्त व्यक्तींची वर्गवारी करून त्यानुसार ते प्रश्न सोडविण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या सामाजिक चिकित्सालयाची संकल्पना केवळ विद्यापीठातच नव्हे, तर देशातीलही कदाचित अशा स्वरूपाचा पहिलाच अभिनव उपक्रम असावा, असे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी सांगितले.
समाजशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. जगन कराडे यांनी सामाजिक चिकित्सालयाची संकल्पना सांगितली. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन, व्ही. एस. मारुलकर, प्रतिमा पवार, पी. बी. देसाई, संजय कांबळे, कोमल ओसवाल, अभिजित पाटील उपस्थित होते. डॉ. पी. एम. माने यांनी आभार मानले.
चौकट
तरुणांसाठी फायदेशीर
समाजमन ओळखून त्यावर बऱ्याच प्रमाणात वैद्यकीय गोळ्या, औषधे न घेताही काही आजार बरे होऊ शकतात. हे चिकित्सालय तरुणांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
फोटो (१४०३२०२१-कोल-सामाजिक चिकित्सालय) :
शिवाजी विद्यापीठात शनिवारी समाजशास्त्र अधिविभागातील सामाजिक चिकित्सालयाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याहस्ते झाले. यावेळी डावीकडून प्रल्हाद माने, जगन कराडे, एस. एस. महाजन, पी. एस. पाटील आदी उपस्थित होते.