शहर वाहतूक शाखेने जपली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:24+5:302021-07-07T04:30:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी ...

Social commitment by the city transport branch | शहर वाहतूक शाखेने जपली सामाजिक बांधिलकी

शहर वाहतूक शाखेने जपली सामाजिक बांधिलकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘नात रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या नावाने आयोजित रक्तदान शिबिरात त्यांनी रक्तदान केले. पोलीस परेड मैदानाजवळील अलंकार हॉलमध्ये शिबिर झाले. शिबिरात एकूण ६८ जणांनी रक्तदान केले.

लोकमतच्या पुढाकाराने अलंकार हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्याहस्ते झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख प्रमुख उपस्थित होते.

शिबिरात शहर वाहतूक आणि मुख्यालयात पोलीस कर्मचारी यांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती. रांग लावून रक्तदान झाले. पोलीस कर्मचारी सुरेश शिवाप्पा घेजी, बाबू कुमान्ना जोशीलकर, सिकंदर आब्बास देसाई, तानाजी लक्ष्मण सुंबे, प्रल्हाद यशवंत देसाई यांना प्रातिनिधिक स्वरूपात लोकमततर्फे रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे यांच्याहस्ते देण्यात आले.

सीपीआर रूग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय विभागीय रक्त केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आसमा मुल्ला, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुवर्णसिंग चव्हाण, रमेश सावंत, प्रयोगशाळा सहायक सतीश सुतार, अधिपरिचारक रणजित केसरे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते राजू नडगिरे, परिचर अस्लम मुल्ला, राहुल धनवडे, अरविंद पाटील, अश्विनी पवाळकर, अविनाश पवाळकर, अमृता कांबळे, अस्लम मुल्ला यांनी रक्तदान शिबिरास मदत केली.

चौकट

मुलाच्या वाढदिवसानिमित्त आईवडिलांचे रक्तदान

दिगंबर मुरलीधर किल्लेदार, सुजाता दिगंबर किल्लेदार या दाम्पत्याचा मुलगा कैवल्य याचा मंगळवारी आठवा वाढदिवस. यानिमित्त त्यांनी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. लोकमततर्फे अलंकार हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे त्यांनी लोकमतमध्ये वाचले. मजरे कासारवाडा (ता. राधानगरी ) येथून ४० किलोमीटरचे अंतर पार करून येत रक्तदान केले. मुलाच्या वाढदिवसानिमित्त वडील दिगंबर, आई सुजाता यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यापूर्वीही दिगंबर यांनी २३ वेळा रक्तदान केले आहे. किल्लेदार कुटुंब वारकरी संप्रदायातील आहे.

फोटो : ०६०७२०२१- कोल- किल्लेदार पती, पत्नी रक्तदान

कोल्हापुरातील अलंकार हॉलमध्ये लोकमततर्फे आयोजित शिबिरात दिगंबर मुरलीधर किल्लेदार, सुजाता दिगंबर किल्लेदार या दाम्पत्याने मुलगा कैवल्य याच्या वाढदिवसानिमित्त ४० किलोमीटरवरून येत रक्तदान केले.

Web Title: Social commitment by the city transport branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.