‘एव्हरग्रीन ग्रुप’ची सामाजिक बांधीलकी
By admin | Published: June 16, 2016 09:35 PM2016-06-16T21:35:00+5:302016-06-17T00:46:52+5:30
यड्रावच्या ग्रुपचे विविध उपक्रम : निसर्ग संवर्धन, गडकिल्ल्याची स्वच्छता, हास्ययोग
घन:शाम कुंभार -- यड्राव -एकापेक्षा अधिक लोक एकत्र आले की, ग्रुप तयार होतो. त्यातून प्रत्येकाच्या विचारसरणीचा मिलाफ झाला की, सामाजिक, नैसर्गिक व पुरातन वास्तु जोपासण्यासाठी पावले पुढे पडतात. त्यातून मिळणारा आनंद व समाधान जीवन कृतार्थतेची अनुभूती देतो. असेच काम निसर्ग संवर्धन, गडकिल्ल्याची स्वच्छता, वेगवेगळ्या पंथाची विश्व प्रार्थना याचबरोबर निरामय जीवनासाठी व्यायामाच्या संदेशासह कृतिशील असलेले येथील एव्हरग्रीन गुडमॉर्निंग ग्रुप विविध उपक्रमांतून सामाजिक बांधीलकी जपत आहे. सर्वांना सुखात, आनंदात ठेव, ही विश्वप्रार्थना जपली जाते.
येथील स्टारनगरमध्ये दररोज सकाळी फिरण्यासाठी येऊन योगासन, प्राणायम यासारखे विविध
प्रकारचे व्यायाम प्रकार एकत्रपणे केले जातात. या गु्रपमध्ये ३५ वर्षांपासून ७६ वर्षापर्यंतच्या व्यक्तींचा
सहभाग असतो. कोळेकर गुरुजी (कोरोची) यांनी शास्त्रशुद्धपणे योग प्रशिक्षण दिले आहे. याठिकाणी हास्ययोग प्रकारही घेतले जातात.
ग्रुपमधील सदस्य प्रत्येक सोमवारी पहाटे डोंगर चढाईसाठी रामलिंग डोंगरावर जातात. तेथे आपल्याकडील असलेली
वृक्षांची बिया रोपण, दुर्मीळ वृक्षांची निगा व स्वच्छता मोहीम
राबविण्यात येते. वर्षातून एकदा गडकिल्ल्यांची मोहीम आखली जाते. गडावर परिसर निरीक्षण, साफसफाई व पुरातन वास्तू जतनाचे महत्त्व इतरांना सांगण्यात येते. नुकतीच भुदरगड किल्ला, रांगणा किल्ला, मौनी विद्यापीठ अशी भ्रमंती झाली. तिथेही निरीक्षण, भ्रमण व स्वच्छता मोहीम राबविली.
या गु्रपमध्ये वेगवेगळ्या परंपरा, आध्यात्मिक पंथाचे सदस्य आहेत. त्यामुळे जीवन सकारात्मकतेच्या प्रबोधनात्मक गोष्टींचे कथन होते. सत्संग असल्याने जीवनाला चांगले वळण मिळते. जीवन विद्या मिशन, संत निरंकारी मंडळ यांच्या विश्वशांती सामुदायिक प्रार्थना दररोज होतात. वृद्धाश्रमांना भेटी देऊन तेथील वृद्धांची आपुलकीने विचारपूस व आवश्यक ती मदत करण्यात येते. बाबा आमटेंच्या आनंदवनाला भेट देऊन त्यांना अन्नधान्य व कपड्यांच्या स्वरूपात मदतही देण्यात आली आहे.
ग्रुपमधील प्रत्येक सदस्याच्या वाढदिनी ग्रुपच्यावतीने एक पुष्पहार घालून शुभेच्छा व विश्वशांती प्रार्थना सामुदायिकपणे म्हटली जाते. सर्वांना सुखात, आनंदात ठेव, ही
सदिच्छा असते.
डॉ. बी. एम. आरगे हे या ग्रुपचे अध्यक्ष आहेत.
उपाध्यक्ष रमेश बी. पाटील, तर कृष्णात सातपुते व राजाराम भांदिगरे इतर जबाबदारी पार पाडतात. या ग्रुपच्या वतीने विविध उपक्रम
राबविले जातात. ही सामाजिक बांधीलकी ‘एव्हरग्रीन गुडमॉर्निंग ग्रुप’ जपत आहे.