प्रेमाच्या दिवसाला ‘सामाजिक’ किनार
By Admin | Published: February 15, 2016 12:52 AM2016-02-15T00:52:45+5:302016-02-15T01:10:12+5:30
विविध संघटनांचा सहभाग : रविवारच्या सुटीने ‘व्हॅलेंटाईन डे’ला संमिश्र प्रतिसाद
कोल्हापूर : ‘कोठेतरी जाऊ शीघ्र विमानी, अज्ञात ठिकाणी, स्वातंत्र्य जिथे, शांती जिथे, प्रेम इमानी, तेथे चल राणी...’ जणू असाच काहीसा भाव मनी घेऊन रविवार हा सुटीचा दिवस असल्याने शहरातील अनेक प्रेमीयुगुलांनी व्हॅलेंटाईन डे शहराबाहेरील, उपनगरांतील उद्यानांत, हॉटेलांत एकमेकांना भेटून फुले देत साजरा केला; तर काहींनी सामाजिक बांधीलकी जपत विविध उपक्रम राबविले. यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ नेमका रविवारी आल्याने महाविद्यालयीन परिसरात शुकशुकाट पसरला होता. त्यामुळे संमिश्र स्थितीतच व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. तरुणाईच्या उत्साहाने रोज वर्दळ असलेल्या कट्ट्यांवर आज तुरळक वर्दळ होती. न्यू कॉलेजच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. परीक्षा जवळ आल्याने अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्हॅलेंटाईनचा जोश दिसला नाही. सामाजिक भान जपत जनकल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधून कुष्ठरोग्यांना चादरीचे वाटप करून गरिबांना प्रेमाची ऊब दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, संगीता पाटील, सागर पाटील, प्रा. पी. जी. अंगज, प्रकाश पाटील, बाळासाहेब कांबळे, अजितकुमार पाटील, सौरभ कांबळे, मारुती पाटील, ओंकार पाटील, आदी उपस्थित होते. सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण केले. तसेच किर्लोस्कर आॅईल इंजिनमधील कर्मचाऱ्यांच्या वतीने बालकल्याण संकुलातील अनाथ मुलांना वॉटर प्युरिफायर व टॉवेल भेट देऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यात आला.
दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखून १४ फेबु्रवारी हा दिवस शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘मातृ-पितृ दिन’ म्हणून साजरा केला जावा यासाठी आंदोलन करण्यात आले. तसेच स्वराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने केली.
ंसोशल मीडियात उत्साहाला उधाण
दिवसभर व्हॉट्स अॅप, फेसबुक, मेसेज अशा माध्यमांतून शुभेच्छापत्रे पाठविणे, मेसेज पाठविणे, फेसबुकवर प्रेम कविता, सेल्फी पोस्ट करणे, लोकेशन स्टेटस अपडेट करणे अशा प्रकारांना ऊत आला होता. एकमेकांना टॅग करीत, शुभेच्छा देत सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा आला.
गुलाबाच्या किमतीत वाढ
व्हॅलेंटाईन डेनिमित्त गुलाबांना रविवारी विशेष मागणी होती. आकर्षकरीत्या सजविलेल्या फुलांनी दुकाने सजली होती. फुलांची विक्री वाढणार हे गृहीत धरून विक्रेत्यांनी पाच रुपयांना असणारे गुलाब चक्क पंधरा ते वीस रुपयांना विकत चांगलाच व्यवसाय केला.