समानता व्यापक केल्यास सामाजिक समरसता वाढेल
By admin | Published: March 8, 2016 12:00 AM2016-03-08T00:00:00+5:302016-03-08T00:51:04+5:30
शेखर चरेगावकर : जातीभेदाचे उच्चाटन करण्यात अपयश आल्याची खंत
इस्लामपूर : कुटुंबातील समानता सामाजिक पातळीवर अधिक व्यापक केल्यास समरसता वाढेल. जातीभेद हा कचरा आहे, तो टाकून दिला पाहिजे, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. मात्र तरीही आपल्याला जातीभेदाचे उच्चाटन करण्यात अपयश आल्याची खंत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केली.
येथील सार्वजनिक तालुका वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेत चरेगावकर यांनी ‘समाजव्यवस्थेतील समरसता’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील अध्यक्षस्थानी होते.
चरेगावकर म्हणाले, समरसता शब्दाला आपल्याकडे जातीय वास देण्यात येतो. उद्योग-व्यवसायावर आधारित जात रचना असल्याने त्याला गहिरेपण येते. प्रत्येक धर्माचे अधिष्ठान एकसमान आहे. त्यामुळे समरसतेला जाती-पक्षाच्या जोखडातून बाहेर काढले पाहिजे. विषमतेला थारा न देता आचरण आणि कृतीमधून समरसता दिसली पाहिजे. राष्ट्राला बलशाली करण्यासाठी समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि व्यापार-उदीमही सचोटीनेच व्हायला हवा. समाजातील सर्व व्यवहार सरळ आणि सचोटीने झाल्यास समरसता भक्कम होईल.
दिलीप पाटील म्हणाले, सहकारात विश्वस्त म्हणून काम करणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगतीच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांच्या हुशार मुलांना परदेशातील शिक्षणासाठी ३५ लाखांपर्यंत अर्थसाहाय्य देणार आहोत. जिल्हा बँकेचे रुपे डेबीट कार्ड घेऊन शेतकरी आता जगाच्या पाठीवर कुठेही व्यवहार करू शकतो. सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, ती वाढली पाहिजे.
दीनानाथ लाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. अमित पानस्कर यांनी आभार मानले. यावेळी प्रा. शामराव पाटील, अॅड. बी. डी. पाटील, अमोल गुरव, संग्रामसिंह पाटील, डॉ. जवाहर शहा, डॉ. सई मंद्रुपकर, गजानन पाटील, सुभाषराव जाधव, सुभाष बाबर उपस्थित होते. (वार्ताहर)
वसंत
व्याख्यानमाला