सामाजिक आशय, प्रेम भावनेचा आविष्कार

By admin | Published: February 15, 2016 10:21 PM2016-02-15T22:21:26+5:302016-02-16T00:05:49+5:30

इचलकरंजीतील रसिकांची दाद : राज्यस्तरीय स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आठ एकांकिका सादर

Social Intent, Love Inception | सामाजिक आशय, प्रेम भावनेचा आविष्कार

सामाजिक आशय, प्रेम भावनेचा आविष्कार

Next

इचलकरंजी : येथील राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सामाजिक आशयाच्या, तसेच प्रेम भावनेचा आविष्कार दाखविणाऱ्या आठ एकांकिका सादर करण्यात आल्या. कोकण, मराठवाडा आणि इचलकरंजीच्या कलाकारांनी या एकांकिका सादर करून रसिकांची दाद मिळविली. मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी यांच्यावतीने या स्पर्धा घेण्यात आल्या.
‘माणूस माझे नाव’ ही रमेश पोवार लिखित एकांकिका महाशाला कलासंगम, गोवा या संघाने चांगल्या प्रकारे सादर केली. देवाने पृथ्वी तलावर माणूस निर्माण केला; पण याच माणसामुळे पृथ्वीचा ऱ्हास होतोय. पाणीटंचाई, प्रदूषण याला माणूसच जबाबदार आहे. यामुळे देवदेखील हतबल झाला आहे, असा आशय यामध्ये होता. रत्नागिरीच्या रसिक रंगभूमी संस्थेने ‘गिमिक’ ही गणेश राऊत लिखित जीवनाचा वेध घेणारी एकांकिका सादर केली.
औरंगाबादच्या नाट्यवाडा या संस्थेने दुष्काळ आणि पाणीटंचाईवरील ‘पाझर’ ही एकांकिका सादर केली. जीवघेण्या दुष्काळात पाण्यासाठी जिद्दीने आड खोदणाऱ्या माणसांची कथा यामध्ये दाखविण्यात आली. प्रवीण पाटेकर यांचे लेखन होते. त्यानंतर ‘ब्रेन’ ही एकांकिका दहशतवादी जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण करणारी होती. नीलेश गोपनारायण लिखित या एकांकिकेत जिहादच्या नावावर तरुणांना वाईट मार्गावर कसे घेऊन जातात, हे दाखविण्यात आले.
निष्पाप थिएटर्सने प्रशांती आजगावकर लिखित ‘जीवनसुक्त’ ही एकांकिका सादर केली. आयुष्याचे तत्त्वज्ञान रूक्ष आणि व्यवहारी पद्धतीने मांडण्यापेक्षा माणुसकी आणि आनंदाने मांडणे हेच खरे होय, असा आशय यात होता. अ. भा. मराठी नाट्य परिषद लातूर या संघाने ‘तुझी जन्मठेप’ ही एकांकिका प्रभावीपणे सादर केली. बाळकृष्ण धायगुंडे लिखित एकांकिकेत सावरकरांचा लढा परकीयांशी होता, तर आज सामान्य माणसाचा व शेतकऱ्यांचा लढा स्वकीयांशी असल्याने कठीण झाले आहे, अशी मांडणी केली आहे.
तसेच रंगयात्रा संस्थेने ‘प्रेम अ-भंग’ या एकांकिकेने रसिकांची दाद मिळविली. तसेच ‘वन सेकंद लाईफ’ ही योगेश सोमण लिखित एकांकिका फॅँटसी शैलीमध्ये होती. अपघातामुळे मरणाच्या दारात गेलेल्या
दोघांची जगण्यासाठी धडपड
आणि कल्पनाशक्ती अशी गोष्ट दाखविण्यात आली आहे.
(वार्ताहर)

Web Title: Social Intent, Love Inception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.