ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सोशल मीडियाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:30+5:302021-01-09T04:19:30+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामीण भागातील ही निवडणूक पूर्वी भाऊबंदकी, गल्लीवर अवलंबून असायची. ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामीण भागातील ही निवडणूक पूर्वी भाऊबंदकी, गल्लीवर अवलंबून असायची. मात्र आता या निवडणुकीत देखील सोशल मीडियाचा वापर वाढला असून अटीतटीच्या लढती असणाऱ्या वॉर्डांमध्ये सोशल धुरळा उडाला आहे. फेसबुक, व्हाॅट्स अप, इन्स्टाग्रामसह ट्विटर, टेलिग्राफसारख्या इन्स्टंट मेसेजिंग ॲपचा वारेमाप वापर होत आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे गावाच्या चौका-चौकात डिजिटल बोर्ड, स्पीकरवरून प्रचार करणारी रिक्षा, सायंकाळी प्रचार फेरी आणि रात्री जेवणावळी... असे काही वर्षांपूर्वी चित्र होते. मात्र सोशल मीडियाच्या जमान्यात गावाच्या निवडणुकीत देखील अमूलाग्र बदल झाले आहेत. पारंपरिक प्रचार साधनांना फाटा देत नवनव्या युक्त्या शोधल्या जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून दर तासाला अपडेट व फोटोंचा भडिमार केला जात असून आपल्या वॉर्डाचे प्रश्न, केलेली विकासकामे, विरोधकांच्या कामांचा पंचनामा केला जात आहे.
या प्रचारात सध्या सर्वात जास्त व्हाॅट्स अप हा इन्स्टंट मेसेजिंग ॲपचा वापर होत आहे. यामध्ये ब्रॉडकास्ट लिस्ट, वॉर्डचा ग्रुप, पॅनेलचा ग्रुप अशी आखणी करून प्रचार, चर्चा सुरू आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे एकाचवेळी अनेकांना आपला संदेश पोहोचवणे सहजशक्य होत असल्याने त्यात देखील दररोज नवनव्या प्रचार साहित्याची देवाण-घेवाण होत आहे. निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी यासाठी काही लोकांकडून सेवा घेतली असून त्यांच्या मदतीने दररोज अपडेट माहिती मतदारांना पोहोचवली जात आहे. गावात, वॉर्डात घडणारी लहान-मोठी कोणतीही घडामोड लगेच सोशल मीडियावर शेअर करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या नव्या माध्यमांचा वापर करून गावात हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कल्पक व्हिडीओंची भरमार
स्टेटस ठेवण्यासाठी तसेच आपले प्रचार चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील तरुण विविध ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडीओ बनवून व्हायरल करतात. या व्हिडीओमध्ये स्थानिक उमेदवारांचे फोटो, केलेल्या कामाची कात्रणे व इतर माहितीचा वापर केला जातो. गाजलेल्या हिंदी, मराठी गाण्यांचा वापर, आकर्षक शब्दफेक याचा वापर अशा व्हिडीओमध्ये होत असतो. अशाप्रकारचे व्हिडीओ उमेदवारांपासून मतदारांपर्यंत सर्वांनाच पसंत पडत आहेत.
कोट
बदललेल्या प्रचार यंत्रणेमुळे सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रचाराची मागणी वाढली आहे. यासाठी लागणारे प्रचार साहित्य बनवण्याचे काम गेल्या महिन्यापासून वाढले आहे. नवीन संकल्पना, डिझाईनला उमेदवारांची मागणी असते.
- अमृत ठोंबरे, अविष्कार डिझाईन, कोल्हापूर