लोकशाही मजबूतीसाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा : दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 05:09 PM2019-03-13T17:09:40+5:302019-03-13T17:11:53+5:30
सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. नागरिक आणि राजकीय पक्षांकडून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे झाल्यास देशाची लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी येथे केले.
कोल्हापूर : सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. नागरिक आणि राजकीय पक्षांकडून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे झाल्यास देशाची लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद अधिविभाग, कोल्हापूर प्रेस क्लब आणि पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्यातर्फे आयोजित परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
‘निवडणुका आणि सोशल मीडिया’ असा परिसंवादाचा विषय होता. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, सोशल मीडियाच्या वापराबाबत तरुण पिढी आणि सर्वच स्तरांमध्ये संस्कार करण्याची गरज निर्माण झाली आहे. विवेक, संवाद, सुसंवाद या त्रिसूत्रीचा उपयोग सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने केला पाहिजे.
कार्यक्रमात छायाचित्रकार सुधारक ओलवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विभागीय माहिती संचालक सतीश लळित, आयटी तज्ज्ञ राजेंद्र पारिजात, सोलापूर विद्यापीठाचे डॉ. रवींद्र चिंचोलकर, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या पत्रकारिता अधिविभागप्रमुख डॉ. निशा पवार यांनी प्रास्ताविक केले. सहायक प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.