मिठाच्या रांगोळीतून दिला सामाजिक संदेश! कोल्हापूरच्या शिवाजी चौगुलेंची किमया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:44 PM2018-02-24T21:44:00+5:302018-02-24T21:44:00+5:30
संदीप आडनाईक ।
कोल्हापूर : चिमूटभर मीठ जेवणामध्ये गोडी आणते. मिठाशिवाय जेवण नीरस आणि बेचव लागते. या मिठाचाच कलेमध्ये प्रतिभेचा वापर करून सामाजिक संदेश देण्याची किमया शिवाजी चौगुले यांनी साधली आहे.
मुंबईत सार्वजनिक आरोग्य विभागात शिपाई असलेले शिवाजी चौगुले यांचे मूळ गाव कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा. दहावीपर्र्यत शिक्षण शिवाजी यांनी सर जे. जे. कला महाविद्यालय परिसरात घुटमळून, पाहून कलेची आवड जोपासली.
२00४ मध्ये आरोग्य खात्यात त्यांना शिपाई म्हणून नोकरी लागली. कौटुंबिक जबाबदाºया पार पाडत सरकारी कार्यालयातील वार्ताफलकावर दैनंदिन आरोग्य सुविचार आणि घोषवाक्ये लिहायला सुरुवात करत आपल्यातल्या कलाकाराला वाट मिळवून दिली.
रांगोळीतून सामाजिक संदेश
२0१५ मध्ये प्रजासत्ताकदिनी स्त्री भ्रूणहत्याविरोधात लेक वाचवा हा संदेश देणारी ४५ किलो मीठापासून मोठी रांगोळी सजविली. माघी गणेश जयंतीला ३0 किलो मीठापासून श्रीगणेशाचे रुप साकारले. स्वातंत्र्यदिनाला ५0 किलो मीठापासून डॉटस क्षयरोग कार्यक्रमांतर्गत पूर्ण कोर्स, पक्का इलाज हा संदेश दिला. शिवजयंतीला ५0 किलो मीठापासून जाणता राजा साकारला. उल्हासनगर पालिका मुख्यालयात आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे या विषयावर १६ बाय २0 चौरस फुटाची तब्बल १६ तास खपून भव्य रांगोळी साकारली. २0१६ च्या स्वातंत्र्यदिनाला नेत्रदान हेच श्रेष्ठदान यावर ४५ किलो मीठापासून रांगोळी साकारली. जागतिक लोकसंख्या दिनी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभाृहात ७0 किलो जाड मीठ आणि ७ किलो रंग वापरुन १६ बाय १८ आकाराची जबाबदारी स्वीकारा, कुटूंब नियोजन पध्दतीचा अवलंब करा, असा संदेश देणारी भव्य आणि नेत्रदीपक रांगोळी रेखाटली.
कलाकृतीसाठी लागते सरासरी १00 किलो मीठ
कोणतीही रांगोळी काढताना शिवाजी मोठ्या मीठाचा वापर करतात. सरासरी १00 किलो मीठ एखादी कलाकृती साकारताना लागते. यात काही किलो रंगांचाही वापर केला जातो. कलाकृती साकारण्यासाठी त्यांना अंदाजे ११ तास लागतात.हे मीठ नंतर नारळीच्या झाडांसाठी वापरले जाते. यामुळे झाडांना कीड लागत नाही. रांगोळी कलाकृतींबद्दल त्यांना ४ पुरस्कार मिळालेले असून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी ते प्रयत्न करत आहेत.
अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांतून माझी कला लोकांसमोर सादर करण्याचा माझा मानस आहे. ही कला जोपासण्यासाठी माझी पत्नी प्रियंका हिची अमूल्य साथ लाभली आहे. कलेमध्ये नावीन्य आणण्यासाठी माझी धडपड आहे. मिठापासून तयार होणाºया कलाकृतीचे प्रदर्शन भरविण्याची आणि याची लिम्का बुकमध्ये नोंद होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
- शिवाजी चौगुले, रांगोळी कलाकार