बालकलाकारांनी मांडले सामाजिक वास्तव

By admin | Published: December 14, 2015 12:24 AM2015-12-14T00:24:04+5:302015-12-14T00:53:17+5:30

बाल कलाविष्कार : १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस प्रारंभ

Social reality presented by child artist | बालकलाकारांनी मांडले सामाजिक वास्तव

बालकलाकारांनी मांडले सामाजिक वास्तव

Next

कोल्हापूर : पर्यावरण रक्षण, पाणीटंचाई, शैक्षणिक प्रश्न, दुष्काळ अशा विविधांगी विषयांवर भाष्य करीत बालकलाकारांनी रविवारी राज्य बालनाट्य स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला. एकापेक्षा एक सरस नाट्यकृती सादर करून त्यांनी सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविले. बालरसिकांच्या ‘हाऊसफुल्ल’ गर्दीत या नाट्यस्पर्धेचा पडदा उघडला.राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला रविवारी प्रारंभ झाला. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये परीक्षक मधुमती पवार, ज्ञानसागर भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी स्पर्धेचे समन्वयक प्रशांत जोशी, शर्वरी जोग, राजेंद्र चौगुले, मिलिंद अष्टेकर, सागर भोसले, संजय जोग, शंकर नायडू, आदी उपस्थित होते. सकाळी अकराच्या सुमारास विद्यामंदिर उचगावच्या ‘शिवरायांचे स्वराज्य’ नाटकाने स्पर्धेचा पडदा उघडला. यातून बालकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकौशल्याचे उपस्थितांना दर्शन घडविले. यानंतर विद्यापीठ हायस्कूलच्या कलाकारांनी ‘जगा आणि जगू द्या’ या नाटकातून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. वि. स. खांडेकर प्रशालेने ‘राजा प्लास्टिक’मधून प्लास्टिक प्रदूषणाची समस्या मांडली. सांगलीच्या श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलने ‘बालदेशभक्त शिरीषकुमार’ यांची देशभक्ती जागविली. बहुरूपी कलामंचने ‘झेप’ हे नाटक प्रभावीपणे सादर केले. यातून स्वावलंबी जीवनशैलीचा संदेश दिला. शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलीया हायस्कूलने ‘निशांत’ आणि सांगलीच्या सिटी हायस्कूलने ‘बोलका आरसा’चे सादरीकरण केले. बालकलाकारांच्या नाट्यकृतीची बुधवार (दि. १६) पर्यंत बालरसिकांना पर्वणी मिळणार आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी ध्वनी, रंगमंच, पोशाख आणि संवाद, अभिनय अशा प्रत्येक पातळीवर बालकलाकारांनी जोरदार तयारी केल्याचे दिवसभर सादर झालेल्या नाटकांतून दिसून आले. कोल्हापूर सांगली, इचलकरंजी, आदी परिसरातील मुले-मुली, पालकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)



प्रतिसाद : बालरसिक, पालकांची गर्दी
थिएटरमधील संयमित वातावरणाचा लाभ होऊन आजची पिढी संयमित व्हावी, या उद्देशाने मुख्याध्यापक व दिग्दर्शक डी. के. रायकर, ए. सी. देसाई, विशाखा जितकर यांनी बाल नाटके मुलांनी का पाहावीत, याकरिता गेल्या आठवडाभरात प्रत्येक शाळेत मुलांचे प्रबोधन केले होते. त्याचा परिणाम म्हणजे स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बालरसिक, पालकांनी गर्दी केली. हे प्रबोधन परिणामकारक ठरल्याचे समन्वयक प्रशांत जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्य नाट्य स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेसाठीही गर्दी होती. बुधवार (दि. १६) पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण १६ नाटके सादर होणार आहेत.

Web Title: Social reality presented by child artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.