शिक्षकांना ‘सोशल’ वंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:28 AM2021-09-06T04:28:20+5:302021-09-06T04:28:20+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या बहुतांश शाळा अद्याप बंद आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना राज्य शासनाने काही अटी, शर्ती ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या बहुतांश शाळा अद्याप बंद आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना राज्य शासनाने काही अटी, शर्ती घालून दिल्या आहेत. त्यातच जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी रोज रुग्ण सापडत आहेत. त्यावर दक्षता म्हणून शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना सोशल मीडिया आणि दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. ‘आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक गुरुवर्यांना शतश: नमन’, ‘ज्ञानरूपी गुरूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’, अशा संदेशांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. काहीजणांनी आपल्या शिक्षकांबाबतच्या आठवणी शेअर केल्या. नूतन मराठी विद्यालय, विजयालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिल्पसागर अकॅडमी, कोपार्डे येथील स. बा. खाडे विद्यालय आदी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आजी-माजी शिक्षकांचा कोरोनाच्या नियमांचे पालन करत सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.
चौकट
‘समाजभान’कडून मदतीचा हात
शिवाजी पेठेतील ज्येष्ठ तबला गुरू वामनराव मिरजकर यांच्या कुटुंबीयांना समाजभान समूहाच्यावतीने धान्य, जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, समाजभान समूह संकल्पक विश्वास सुतार यांच्या हस्ते मदत देण्यात आली. शिक्षक हरिदास वर्णे, लक्ष्मी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजीराव कांबळे, अशोक नायकवडे, आनंद पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.