मिठाच्या रांगोळीतून सामाजिक गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:47 AM2018-02-26T00:47:17+5:302018-02-26T00:47:17+5:30
संदीप आडनाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चिमूटभर मीठ जेवणाची चव वाढविते. मिठाशिवाय जेवण नीरस आणि बेचव लागतं. या मिठाचाच कलेमध्ये प्रतिभेचा वापर करून सामाजिक संदेश देण्याची किमया शिवाजी चौगुले यांनी साधली आहे.
मुंबईत सार्वजनिक आरोग्य विभागात शिपाई असलेले शिवाजी चौगुले यांचे मूळ गाव कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा. आई वडील शेती करतात. दहावीपर्यंत उत्तूर येथे शिक्षण झाले. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड. जख्खेवाडी (ता.गडहिंग्लज) येथे मामा देवदास संकपाळ यांच्याकडे त्याचे लहानपण गेले. २००२ पासून मुंबईत मामासोबत केश कर्तनालयाचा व्यवसाय सुरू केला. २००४ मध्ये आरोग्य खात्यात शिपाई म्हणून नोकरी लागली. कौटुंबिक जबाबदाºया पार पाडत सरकारी कार्यालयातील वार्ताफलकावर दैनंदिन आरोग्य सुविचार आणि घोषवाक्ये लिहायला सुरुवात करीत आपल्यातील कलाकाराला वाट मिळवून दिली.
स्केच पेंटिंग आणि अक्षर गणेश साकारण्याची कलाही त्यांच्या अंगी आहे. रांगोळी कलाकृतींबद्दल त्यांना चार पुरस्कार मिळालेले असून, ‘लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी ते प्रयत्न करीत आहेत. मिठापासून बनविलेल्या या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्याची त्यांची इच्छा आहे.
रांगोळीतून सामाजिक संदेश
त्यांनी २०१५ मध्ये प्रजासत्ताकदिनी स्त्री-भ्रूणहत्याविरोधात ‘लेक वाचवा’ हा संदेश देणारी ४५ किलो मिठापासून मोठी रांगोळी सजविली. माघी गणेश जयंतीला ३० किलो मिठापासून त्यांनी श्रीगणेशाचे रूप साकारले. स्वातंत्र्यदिनाला ५० किलो मिठापासून डॉट्स क्षयरोग कार्यक्रमांतर्गत ‘पूर्ण कोर्स, पक्का इलाज’ हा संदेश दिला. शिवजयंतीला ५० किलो मिठापासून जाणता राजा साकारला. उल्हासनगर पालिका मुख्यालयात ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे’ या विषयावर १६ बाय २० चौरस फुटांची तब्बल १६ तास खपून भव्य रांगोळी साकारली. २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाला ‘नेत्रदान हेच श्रेष्ठदान’ यावर ४५ किलो मिठापासून रांगोळी साकारली. ‘जागतिक क्षयरोग दिनी’ शिवाजीने साकारलेल्या भव्य रांगोळीची दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यांना सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते शिवाजी यांचा गौरव करण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिनी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ७० किलो जाड मीठ आणि सात किलो रंग वापरुन १६ बाय १८ आकाराची ‘जबाबदारी स्वीकारा, कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करा,’ असा संदेश देणारी भव्य आणि नेत्रदीपक रांगोळी रेखाटली. सेंट जॉर्जेस रुग्णालय येथील गणेशोत्सव मंडळासाठी १०५ किलो जाड मीठ आणि ८ किलो रंग वापरून १६ बाय १८ ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ ही रांगोळी रेखाटली.
कलाकृतीसाठी लागते सरासरी १०० किलो मीठ
कोणतीही रांगोळी काढताना शिवाजी मोठ्या मिठाचा वापर करतात. एखादी कलाकृती साकारताना सरासरी १०० किलो मीठ लागते. यात काही किलो रंगांचाही वापर केला जातो. कलाकृती साकारण्यासाठी त्यांना अंदाजे ११ तास लागतात. यासाठी लागणारे मीठ ते मस्जीद बंदर येथून किरकोळ भावाने विकत घेतात. त्याचा सरासरी सहा रुपये किलो दर पडतो. हे मीठ नंतर नारळीच्या झाडांसाठी वापरले जाते. यामुळे झाडांना कीड लागत नाही. कार्यालयीन परिसरात यासाठी सहा झाडे लावून ती जगविली आहेत.