समाजकल्याण सभापती स्वाती सासनेंचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:01+5:302021-06-02T04:20:01+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सभापती स्वाती सासने यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सभापती स्वाती सासने यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, बुधवारी होणारी शिवसेना नेत्यांची बैठक आता शनिवारी होणार आहे. सासने यांच्या राजीनाम्यामुळे आता बांधकाम सभापती हंबीरराव पाटील आणि शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्यावरील दबाव वाढला आहे.
जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाच्या मोहिमेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याशिवाय गती येणार नसल्याने २७ मे रोजी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली; मात्र सासने वगळता अन्य दोन्ही पदाधिकारी बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे बुधवारी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतु ती आता शनिवारी घेण्यात येणार असल्याचे देवणे यांनी सांगितले.
चौकट
तोपर्यंत नेत्यांवर जबाबदारी
शनिवारपर्यंत हंबीरराव पाटील आणि प्रवीण यादव यांचे राजीनामे घेण्याची जबाबदारी शिवसेनेच्या नेत्यांवर दुधवडकर यांनी सोपवली आहे. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव यांच्यावर ही राजीनामे घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाल्याने आजपासून हे नेते यासाठी सक्रिय राहणार आहेत. माजी आमदार उल्हास पाटील यांच्या सूचनेनुसार स्वाती सासने यांनी राजीनामा दिल्यामुळे आता माजी आमदार सत्यजित पाटील आणि डॉ. सुजित मिणचेकर यांच्यावरही दबाव वाढला आहे.