कर्तव्यदक्ष सेनेच्या शिलेदारांचे सामाजिक कर्तृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:02+5:302021-06-03T04:18:02+5:30

विनायक शिंपुकडे लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : समाजातील गरीब, गरजू व उपेक्षित लोकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत काहीतरी केले पाहिजे. ...

The social work of the conscientious objectors | कर्तव्यदक्ष सेनेच्या शिलेदारांचे सामाजिक कर्तृत्व

कर्तव्यदक्ष सेनेच्या शिलेदारांचे सामाजिक कर्तृत्व

Next

विनायक शिंपुकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : समाजातील गरीब, गरजू व उपेक्षित लोकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत काहीतरी केले पाहिजे. आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून दोघा मित्रांनी सुरू केलेल्या संघटनेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. केवळ मदत नाही, तर एक सामाजिक कर्तव्य हे ब्रीदवाक्य घेऊन कर्तव्यदक्ष सेना अनेक जिल्ह्यात कार्यरत आहे.

कर्तव्यदक्ष सेनेचे सस्थापक अध्यक्ष गणेश आरबोळे-पाटील या युवकाने वैभव पोतदार या मित्रासोबत संस्थेचे कार्य सुरू केले. सुरुवातीला जमा केलेल्या पैशातून जमेल तेवढी मदत करण्यास सुरुवात केली. आज संस्थेचे कोल्हापूर जिल्ह्यासह मुंबई, पुणे या ठिकाणी कार्य सुरू असून, जवळपास अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

सचिन पाटील, सत्यजित सेजवळ, अजिंक्य जाधव, ओंकार लाटवडे, प्रीतम यादव, गणेश कांबळे हे शिलेदार सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात.

गतवर्षी लॉकडाऊन काळामध्ये अनेक कष्टकरी लोकांचे कामे बंद झाल्याने रस्ते, पदपथ, झोपडपट्टीत राहणारे व हातावर पोट असलेल्यांचे प्रचंड हाल झाले. हे दृश्य पाहून सेनेच्या तरुणांनी माणुसकीचे दर्शन घडवत अनेक गरजू लोकांना अत्यावश्यक साहित्याच्या किटचे वाटप केले आहे. तसेच यावर्षी शहरातील भुकेले फिरस्ते व लोकांची उपासमार होत असल्याने अशा कठीण प्रसंगात अन्न पाण्याची व्यवस्था केली आहे.

शहर व परिसरातील वृक्ष लागवडची गरज ओळखून जवळपास एक हजार वृक्षांची लागवड केली आहे. तसेच अनेक संस्थांना वृक्षांची रोपे भेट दिली आहेत. स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून अनेक ठिकाणी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे, यासाठी पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती केली, तर सन २०१९ साली आलेल्या महापुराच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत केली. पूर ओसरल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्या भागात स्वच्छता मोहीम राबविली.

या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थानी सत्कार केला आहे.

चौकटी

पुरस्काराची रक्कमही केली परत

संस्थेस सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. काही पुरस्कारासह रोख रक्कम मिळाली आहे. ही रक्कम न स्वीकारता संस्थेला सामाजिक कार्यासाठी रक्कम परत केली आहे.

भागातील महिलांचाही समावेश

सध्याच्या कोरोना काळात संस्थेमार्फत शहर व परिसरातील गरजूंना जेवण देण्याचे काम सुरू आहे. युवकांची समाजासाठी असलेली धडपड पाहून भागातील अनेक महिलाही पुढाकार घेत दररोज जेवण तयार करण्यासाठी मदत करत आहेत.

फोटो ओळी

०२०६२०२१-आयसीएच-०१

कर्तव्यदक्ष सेनेचे कार्यकर्ते ठिकठिकाणी वृक्षारोपण करतात.

०२०६२०२१-आयसीएच-०२

कोरोनाच्या काळात गरजूंना जेवणाचे पॅकेट महिला तयार करीत होत्या.

Web Title: The social work of the conscientious objectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.