अडीच लाखांचा लग्न खर्च सामाजिक कार्याला
By admin | Published: May 1, 2017 12:41 AM2017-05-01T00:41:08+5:302017-05-01T00:41:08+5:30
अडीच लाखांचा लग्न खर्च सामाजिक कार्याला
कोल्हापूर : हुंडा प्रथेला विरोध तसेच लग्नातील वारेमाप खर्चाला फाटा देत मुंबई पोलिस कल्याण निधीसह अन्य सामाजिक कार्याला सुमारे अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन पोलीस उपनिरीक्षक डॉ. मनोज व सरिता पाटील या नवदाम्पत्याने अनोख्या पद्धतीने आदर्शवत असा विवाह साजरा केला.
मनोज महिपती पाटील (रा. देवाळे, ता. पन्हाळा) हे सध्या मुंबई येथील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक आहेत. त्यांचे इचलकरंजी येथील सरिता यांच्याशी लग्न ठरले. सरिता ह्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली येथे कार्यरत आहेत. दोघेही पोलीस उपनिरीक्षक पदावर असल्याने लग्न राजेशाही थाटात करण्याचा पै-पाहुण्यांचा आग्रह होता; परंतु या दोघांनीही पारंपरिक पद्धतीला फाटा देत २८ एप्रिल रोजी अतिशय साध्या पद्धतीने नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील दत्तमंदिराशेजारील छोटेखानी हॉलमध्ये लग्न केले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवून समाजातील एकोपा टिकून राहावा, असा संदेश दिला. भोजन, मिरवणूक, मंडप, मानपान यासारखा अनावश्यक खर्च टाळून लग्नकार्यास येणाऱ्या खर्चाची रक्कम सामाजिक कार्यास मदत स्वरूपात देऊन या नवदाम्पत्याने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
ज्या गावात लहानाचे मोठे झालो, शिकलो तेथील ऋणानुबंध जपण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांना ५५ हजार, पोलीस कल्याण निधी मुंबईसाठी ५० हजार, ‘नाम फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेस ५० हजार, गावातील ग्राममंदिर व जलसंधारण योजनेसाठी ४० हजार, पाटणे (ता. शाहूवाडी) येथील वाचनालयास पाच हजार अशी मदत केली. लग्नकार्यास आलेल्या पाहुण्यांना झाडाचे रोप देऊन पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवण्याचा संदेशही द्यायला ते विसरले नाहीत. (प्रतिनिधी)