सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा पाटील यांचे निधन
By admin | Published: June 16, 2014 12:51 AM2014-06-16T00:51:21+5:302014-06-16T00:52:06+5:30
महिला चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्त्या
कोल्हापूर : महिला चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा संतराम पाटील तथा कृष्णाबाई दातार यांचे ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने आज, रविवारी सकाळी साडेनऊ वाजता निधन झाले.
सुमित्रा पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजेंद्रनगरमधील स्वातंत्र्यसैनिक वसाहतीमध्ये त्यांच्या निवासस्थानी तसेच सायंकाळी लक्ष्मीपुरीतील श्रमिक हॉलमध्ये राजकीय, सामाजिक आणि चळवळीच्या क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. पंचगंगा स्मशानभूमीत रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा अजित, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी नऊ वाजता कोल्हापुरात आहे.
देवरूख (जि. रत्नागिरी) जवळच्या एका खेडेगावातील दातार कुटुंबात सुमित्रा यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण गरीबीत गेले. शालेय शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सैन्यात नोकरी पत्करली. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर कोल्हापुरात त्या लाल निशाण पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्या आणि त्या पक्षात सहभागी झाल्या. संतराम पाटील यांच्याशी लग्न होऊन कृष्णाच्या सुमित्रा बनून त्या पुण्यातून कोल्हापुरात आल्या. नवजीवन संघटनेच्या या दोन पूर्णवेळ कार्यकर्त्यांचा झालेला विवाह हा त्यावेळची एक मोठी सामाजिक घटना होती. संतराम यांच्या राजकीय कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी जन्मभर त्यांची साथ केली. त्याकाळी नोकरी करून संसार चालविला तसेच अनेक कार्यकर्त्यांची कुटुंबे तेव्हा एकत्र ‘कम्युन’ (सामुदायिक जीवन) मध्ये राहात. त्यांनी या ‘कम्युन’च्या कर्त्या म्हणून काम केले. संतराम यांच्या निधनानंतरही त्यांच्या समाजकार्याची झेप मंदावली नाही. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले. ट्रस्टचे विविध उपक्रम, १५०० हून अधिक स्वयंसहाय्यता बचत गटाची चळवळ यशस्वीपणे चालविली. महिला आरक्षण, आर्थिक साक्षरता प्रबोधनाबाबत त्यांनी परिषदा घेतल्या. वक्तशीरपणा, साधी राहणी, परखड संभाषणकौशल्य ही त्यांची वैशिष्ट्ये होती. मराठी, इंग्रजी व संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यासह कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची अनेक वर्षे जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांना राज्य शासनाने ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ देऊन गौरविले होते. मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचे समाजकार्य सुरू होते. ट्रस्टतर्फे चालविलेल्या बचतगटांच्या उपक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील ‘नाबार्ड’ची पहिली मान्यता मिळाली होती. दरम्यान, सुमित्रा यांच्या अंत्यदर्शनासाठी ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, यशवंत चव्हाण, सुरेश सावंत, भारती शर्मा, सुरेश शिपूरकर, तनुजा शिपूरकर, आनंदराव पाटील आदींसह मुंबई, पुणे, सांगली, आदींसह परिसरातील कार्यकर्ते आले होते. (प्रतिनिधी)