इचलकरंजी पालिकेच्या दारात सामाजिक कार्यकर्त्याचा पेटवून घेतल्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 02:40 AM2020-10-27T02:40:41+5:302020-10-27T02:41:41+5:30
Ichalkaranji News : सामाजिक कार्यकर्ते नरेश सीताराम भोरे (वय ४८, रा. सोलगे मळा, शहापूर) यांनी सोमवारी नगरपालिकेच्या पार्किंग प्रवेशद्वारात पेटवून घेतले. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.
इचलकरंजी- घंटागाडीचालकाकडून झालेल्या अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ व मारहाणीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते नरेश सीताराम भोरे (वय ४८, रा. सोलगे मळा, शहापूर) यांनी सोमवारी नगरपालिकेच्या पार्किंग प्रवेशद्वारात पेटवून घेतले. त्यात ते गंभीर जखमी झाले. सांगली येथील सिव्हील रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे.
याबाबत माहिती अशी, १९ ऑक्टोबरला शहापूर परिसरातून अमर प्रकाश लाखे हा घंटागाडीचालक मृत डुक्कर घंटागाडीला बांधून रस्त्यावरून ओढत नेत होता. त्यावेळी नरेश भोरे यांनी त्याला तू असे मृत डुक्कर ओढत नेऊ नकोस म्हणून अटकाव केला. त्यावर चिडून संबंधित चालकाने भोरे यांना शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकाराच्या निषेधार्थ भोरे यांनी नगरपालिकेला संबंधित ठेकेदार कंपनीवर पेटा अॅनिमल कायद्यांतर्गत कारवाई करावी व संबंधित घंटागाडीचालकावरही कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा २६ ऑक्टोबरला आत्मदहन करू असा इशारा त्यांनी २० ऑक्टोबरला दिला होता. सोमवारी भोरे यांनी नगरपालिकेच्या दक्षिण बाजूच्या पार्किंग मार्गातून आत प्रवेश करून स्वत:ला पेटवून घेतले. त्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसह पालिका कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांना उपचारासाठी रिक्षातून आयजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु, सुमारे ६० टक्के भाजले गेल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारांदरम्यान सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.