समाजासाठी देवस्थानच्या पैशांचा विनीयोग व्हावा-चंद्रकांतदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:02 AM2017-10-18T01:02:35+5:302017-10-18T01:06:19+5:30
कोल्हापूर : नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असल्याने मंदिर व्यवस्थापनाचे शासकीय यंत्रणांवरही मोठे दडपण होते
कोल्हापूर : नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असल्याने मंदिर व्यवस्थापनाचे शासकीय यंत्रणांवरही मोठे दडपण होते. मात्र, देवीचा उत्सव विनासायास पार पडला. देवीला येणारा पैसा हा भक्तांकडूनच दिला जात असल्याने त्याचा वापरही समाजासाठी झाला पाहिजे, असे मत मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवात सेवा दिलेल्या व्यक्ती व संस्थांच्या सत्काराचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे उपस्थित होत्या.
पालकमंत्री म्हणाले, अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे परस्थ भाविकांची मोठी सोय होणार आहे. श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानच्याही २५ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली असून काही दिवसांत विकासकामांना सुरुवात होईल.
खासदार धनंजय महाडिक यांनी सुवर्णपालखीचा उल्लेख करून यंदाचा नवरात्रौत्सव अधिक मोठ्या प्रमाणात पार पडल्याचे सांगितले. तसेच ‘देवस्थान’च्या भावी योजनांना सदैव पाठबळ राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी जीवनज्योती, व्हाईट आर्मी, पोलीस प्रशासन, महापालिका, ‘महावितरण’चे कर्मचारी, वाहतूक शाखा, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, अॅस्टर आधार, अॅपल हॉस्पिटल, महालक्ष्मी भक्त मंडळ, पत्रकार यांच्यासह मंदिरात सेवा दिलेल्या व्यक्ती व संस्थांचा गौरव केला. महेश जाधव यांनी प्रास्ताविक, संगीता खाडे यांनी आभार मानले.
अंबाबाईचे मोबाईलवरही दर्शन
यावेळी देवस्थान समितीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या अंबाबाई अँड्रॉईड अॅपचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. या अॅपमुळे जगाच्या कानाकोपºयात असलेल्या भक्तांनाही अंबाबाईचे लाईव्ह दर्शन मिळणार आहे.