समाजात अजूनही माणुसकी टिकून
By admin | Published: June 10, 2015 11:55 PM2015-06-10T23:55:09+5:302015-06-11T00:12:55+5:30
अमित सैनी : अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे महेशचा सत्कार
कोल्हापूर : अपंगांना समस्या भरपूर असतात. मात्र, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणारे लोक समाजात मोजकेच असतात. त्यांपैकी ‘अखिल भारतीय मराठा संघ’ हा एक आहे. नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या अशा महासंघामुळे समाजात अजूनही माणुसकी टिकून आहे. ‘महेश’सारख्या जिद्दी युवकाचा योग्य सत्कार करून त्याला त्यांनी नवे पंख दिले आहेत. सामाजिक बांधीलकी जपत प्रशासनाच्यावतीनेही महेशला जी काही मदत करता येईल, ती सर्वतोपरी केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली.
शाहू स्मारक भवन येथे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्यातील खर्चाला फाटा देत सामाजिक बांधीलकी जपत अपघातामध्ये दोन्ही हात व पाय गमाविलेल्या महेश याच्या नावे बुधवारी ११ हजार रुपयांची ठेव पावती ठेवण्यात आली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीसप्रमुख
डॉ. मनोजकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
सैनी म्हणाले, महेशने अपंगत्वामुळे स्वत:चे खच्चीकरण करून न घेता, अपंगत्व विसरून दुसऱ्यांना शिकविण्याचे काम केले आहे. त्याचे काम खरेच कौतुकास्पद आहे. महेशने उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत रुजू व्हावे, अशी मी त्याला शुभेच्छा देतो.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शर्मा म्हणाले, विधायक कामे करणारे कमी आणि प्रसिद्धी मिळविणारे अनेकजण असतात. मात्र, मराठा महासंघाने सर्व समाजाला एकत्र आणत हे विधायक काम केले आहे.
जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, श्रीनिवास गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शशिकांत पाटील यांनी स्वागत केले; तर शामराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी कादर मलबारी, भाऊसाहेब काळे, शंकरराव शेळके, चंद्रकांत चव्हाण, प्रकाश पाटील, आप्पा मिसाळ,
डॉ. शिवाजीराव हिलगे, अवधूत पाटील, शैलजा भोसले, प्रताप साळोखे, डॉ. डी. बी. चौगुले, महादेव पाटील, किशोर घाटगे, उषा लांडे, प्रकाश नलवडे, शामराव पाटील, राजू फरांडेकर, आदी उपस्थित होते.
पंधरा मुलांची शिकवणी...
वयाच्या चौदाव्या वर्षी घरावरील पतंग काढताना विजेचा धक्का बसून महेशला दोन्ही हात-पाय गमवावे लागले. यावर ना उमेद न होता महेशने बी. ए. (इंग्रजी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महेश आपल्या घरामध्ये इंग्रजी शिकवणी घेऊन मुलांना मार्गदर्शन करीत आहे. सध्या तो पंधरा मुलांना इंग्रजी शिक विण्याचे काम करीत आहे.