मुलीच्या अपहरणाच्या पोस्टने समाजमन अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:28 AM2021-08-13T04:28:45+5:302021-08-13T04:28:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आपल्या सात वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याच्या नॅकचे सल्लागार डॉ. जगन्नाथ सीताराम पाटील यांच्या सोशल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आपल्या सात वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याच्या नॅकचे सल्लागार डॉ. जगन्नाथ सीताराम पाटील यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने गुरुवारी दिवसभर खळबळ उडवून दिली. मुलीचे अपहरण म्हटल्याने अनेक जण अस्वस्थ झाले. सायंकाळनंतर हा प्रकार कौटुंबिक वादातून झाला असल्याचे स्पष्ट झाले. परंतु या पोस्टचा अनेकांना मानसिक त्रास झाला. या मुलीचा ठावठिकाणा तातडीने शोधून समितीसमोर हजर करण्याचे आदेश कोल्हापूरच्या बालकल्याण समितीने पोलिसांना दिले आहेत.
डॉ. पाटील हे मूळचे तिटवे (ता. राधानगरी) गावचे. शिवाजी विद्यापीठात वृृत्तपत्र विभागात अधिव्याख्याता म्हणून काही काळ तर नंतर उपकुलसचिव म्हणूनही त्यांनी काम केले. बंगळूरूमधील नॅकचे सल्लागार झाल्यानंतर त्यांचा महाविद्यालयांशी मोठा संपर्क आला. त्यामुळे त्यांनीच मुलीचे अपहरण झाल्याचे जाहीर केल्यावर खळबळ उडाली. त्याबद्दल कुणी माहिती दिल्यास ५ लाखांचे बक्षीसही जाहीर केले. दुपारपर्यंत सोशल मीडियावर असा एकही ग्रुप नसेल की त्यावर ही पोस्ट व्हायरल झाली नाही. दुपारनंतर मात्र त्यातील कौटुंबिक वादाचे कंगोरे हळूहळू पुढे आले. डॉ. पाटील यांच्या बंगळूरूमधील घरातूनच सात दिवसांपूर्वी त्या मुलीस दोन महिला जबरदस्तीने काढून घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये एक महिला मुलीस नेऊ नका, अशी विनंती करताना दिसते. दोन महिलांच्या ओढाताणीमध्ये त्या बिचाऱ्या मुलीचा आक्रोश मात्र व्हिडीओ पाहणाऱ्या कुणाच्या मनांतही कालवाकालव निर्माण करतो. त्या व्हिडीओमध्ये माता न तू वैरिणी, जन्मदात्री आणि गुंड मामाकडून मुलीचे अपहरण, बालकल्याण समितीकडून मुलीच्या सुटकेसाठी आदेश.. असे म्हटले होते. त्यावरून मुलीचे अपहरण तिच्या आईनेच केले असल्याचे पुढे आले.
घडल्या प्रकाराबाबत बंगळुरूमधील केंगरी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंद केली आहे. बालकल्याण समितीने मुलीस हजर करण्याचे आदेश कोल्हापूर पोलीस अधीक्षक व राधानगरी पोलिसांना दिले आहेत. मुलीचा तातडीने शोध लागावा
डॉ. जगन्नाथ पाटील
बालन्याय कायद्याच्या विरोधातील कृत्य
हे प्रकरण कोल्हापूरच्या बालकल्याण समितीपुढे बुधवारी गेले होते. जगन्नाथ पाटील व त्यांच्या आई समितीसमोर हजर झाल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद तयार झाल्याने गेले चार महिने ते दोघेही वेगळे राहत आहेत. मुलगा आई प्रगतीसोबत तर मुलगी वडिलांसोबत राहत होती. पण मुलीच्या मनाचा विचार न करता तिच्या आईने व चेहरा न दिसणाऱ्या पुरुषाने त्या मुलीस काळजीवाहक शिक्षिकेच्या ताब्यातून बळजबरीने नेणे हे बाल न्याय कायद्यातील तरतुदीच्या विरोधातील आहे, असे निरीक्षण बालकल्याण समितीने नोंदवले आहे.