‘सोहाळे’ बंधारा डागडुजी प्रश्न ऐरणीवर
By admin | Published: January 8, 2015 10:03 PM2015-01-08T22:03:42+5:302015-01-09T00:03:20+5:30
परस्पर विरोधी भूमिका : सोहाळे येथील राजीव गांधी सिंचन, कृषी विकास योजना बंद होणार ?
ज्योतिप्रसाद सावंत- आजरा -ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ‘सोहाळे’ बंधाऱ्याची डागडुजी व पाणी अडविण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ११ लाख ५० हजार रुपयांचा लोकसहभाग १५ जानेवारी पूर्वी न भरल्यास राजीव गांधी सिंचन व कृषी विकास योजना बंद करण्याचा इशारा अधीक्षक अभियंता व्ही. जी. रजपूत यांनी दिला आहे. तर प्रथम बंधाऱ्याची दुरुस्ती करून पाणी अडवा त्यानंतर लोकसहभागाचे पाहू, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने ‘सोहाळे’चे भवितव्य अधांतरी बनले आहे.
‘सोहाळे’ बंधारा हा लघुसिंचन विभागाकडे येतो. सोहाळे बंधाऱ्यावर सुमारे अडीचशे हेक्टर बागायत क्षेत्राचे सिंचन अवलंबून आहे. बंधाऱ्याचे बरगे सडल्याने व बंधाऱ्याची डागडुजी असल्याने यावर्षी पाणी अद्याप अडविण्यात आलेले नाही. पुढील महिन्यापासून येथील पिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत जाणार आहे. या बंधाऱ्याची डागडुजी करणे व बरगे बदलणे यासाठी १ कोटी १० लाख रुपयांचा निधी लघुसिंचन विभागाकडे आला आहे.
बंधाऱ्याच्या देखरेखीचे काम स्थानिक पाणी वापर संस्थेकडे आहे. ११ लाख ५० हजार रूपयांचा लोकसहभाग झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला कामाचा कार्यारंभ आदेश देता येत नाही, असे लघुसिंचन विभागाचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर लघुसिंचनचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. रजपूत यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी लोकसहभाग माफही होणार नाही व कमीही होणार नाही, असे सांगत लोकसहभाग भरण्यासंदर्भात १५ जानेवारी ही डेडलाईन दिली आहे.
यावेळी बंधाऱ्याचे पाणीच नाही, बंधाऱ्याची दुरुस्तीही सुरू नाही. येथून पुढे दुरुस्ती होणार कधी आणि पाणी अडवणार कधी ? बंधाऱ्यातील पाणी यावर्षी शेतीला उपलब्ध होण्याची शक्यताच नसल्याने प्रथम बंधाऱ्याची दुरुस्ती करा. त्यामध्ये पाणी अडवा त्यानंतरच लोकसहभाग भरू, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
दोन्ही बाजूंचा विचार केल्यास सोहाळे या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची ‘डागडुजी’ होणे कठीण बनत चालले आहे. यामुळे या बंधाऱ्याकरिता असणारी राजीव गांधी सिंचन व कृषी विकास योजना बंद होण्याची शक्यता आहे.
उशीरा सुचलेले शहाणपण
बंधाऱ्यात पाणी अडविण्याचा कालावधी संपत आल्यानंतर लघुसिंचन विभागाला जाग आली आहे. यापूर्वीच ठोस उपाययोजना अथवा बैठक झाली असती, तर कदाचित आज बंधाऱ्यात पाणीही साठले असते.