म्हाकवेतील सोहमला खेलो इंडियात सुवर्ण ; शाहू साखर कारखान्याचा मानधनधारक मल्ल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 08:29 PM2024-01-29T20:29:36+5:302024-01-29T20:29:45+5:30
म्हाकवे (ता.कागल) येथिल मल्ल सोहम सुनिल कुंभार यांने चेन्नई येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत ५१किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावून गावच्या कुस्ती क्षेत्राला सुवर्ण झळाळी दिली आहे.
दत्ता पाटील
म्हाकवे : म्हाकवे (ता.कागल) येथिल मल्ल सोहम सुनिल कुंभार यांने चेन्नई येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत ५१किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावून गावच्या कुस्ती क्षेत्राला सुवर्ण झळाळी दिली आहे. तो शाहू साखर कारखान्याचा मानधनधारक मल्ल आहे. त्यांने मध्यप्रदेश, दिल्ली आणि हरयाणा येथील मल्लांवर १०-०ने मात केली. तर अंतिम लढतीत त्यांने उत्तर प्रदेशच्या मल्लाला ५-४ गुणांची आघाडी घेत सुवर्णपदकावर नाव कोरले.त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यापूर्वीही अनेक कुस्ती स्पर्धेत त्याने यश संपादन केले आहे. कुस्ती पंढरी बानगे येथिल जय भवानी तालमीत तो सराव करतो. त्याला शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे प्रोत्साहन तर उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, वस्ताद तुकाराम चोपडे, शिवाजी जमनिक, भाऊसाहेब सावंत, बाळासाहेब कापडे,आकाश नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
चिखलातून उमलले 'कमळ'...
वीट भट्टीचा पारंपरिक व्यवसाय अत्यंत कष्टप्रद परिस्थितीतून वडील सुनिल यांनी सोहमला वयाच्या पाच वर्षापासूनच मल्ल बनविण्याचा ध्यास घेतला.यासाठी या कुटुंबाने प्रचंड कष्ट उपसले.त्याचे आज फलित झाल्याचे गावकरी व मार्गदर्शक रवींद्र पाटील यांनी सांगितले.