सोलर सिटी व वाय-फाय सेवा मोफत

By admin | Published: March 3, 2017 01:08 AM2017-03-03T01:08:51+5:302017-03-03T01:08:51+5:30

इचलकरंजीसाठी पुनर्प्रस्ताव : हाळवणकरांची माहिती, सहा महिन्यांत आधुनिक रुग्णसेवा

Solar City and Wi-Fi services are free | सोलर सिटी व वाय-फाय सेवा मोफत

सोलर सिटी व वाय-फाय सेवा मोफत

Next

इचलकरंजी : इचलकरंजी शहर सोलर सिटी करण्याबरोबरच काही प्रमुख चौकांमध्ये वाय-फाय सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा पुनर्प्रस्ताव नगरपालिकेने शासनाकडे द्यावा. शासनाच्या नगरविकास खात्याकडून दोन्ही प्रस्ताव मंजूर करून घेऊन त्याची उभारणी करण्यात येईल, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकारांना दिली.
नगरपालिकेमध्ये कार्यक्रमासाठी आलेले आमदार हाळवणकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, जलअभियंता सुरेश कमळे, नगरअभियंता बापूसाहेब चौधरी, सभापती लतीफ गैबान, नेहा हुक्किरे, सारिका धुत्रे, सोनाली अनुसे, पक्षप्रतोद तानाजी पोवार, अजित जाधव, आदी उपस्थित होते. यापूर्वी सोलर सिटीचा प्रस्ताव नगरपालिकेकडे देण्यात आला होता. मात्र, न झालेल्या प्रस्तावामध्ये घोटाळा झाला, असा विरोधकांनी बिनबुडाचा आरोप करून त्याला प्रचंड विरोध केला. त्यामुळे शासनाने हा प्रस्ताव रद्द केला.
इचलकरंजीमधील प्रमुख चौकांत वाय-फाय सेवा देण्यासाठी शासनाकडे दिलेला यापूर्वीचा प्रस्ताव काही तांत्रिक त्रुटींमुळे रद्द झाला. मात्र, इस्लामपूर नगरपरिषदेने तयार केलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून वाय-फाय सेवा देण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने पुन्हा शासनाला द्यावा, असे सूचित करून आमदार हाळवणकर म्हणाले, शहरामध्ये विविध अशा नऊ ठिकाणी आमदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा उभी केली आहे. याशिवाय आणखीन काही प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभे करण्याचा प्रस्ताव पालिकेने शासनाला द्यावा.
आयजीएम दवाखाना हस्तांतरित करून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मार्च महिनाअखेर दवाखान्याकडे असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन नगरपालिकेने द्यावयाचे असून, दवाखान्यासाठी दहा कोटी रुपये निधीची शासनाने तरतूद केली आहे. या निधीतून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुढील वेतन दिले जाईल. त्याचप्रमाणे दवाखान्याकडे आवश्यक असलेला २२५ अधिकारी व कर्मचारी वर्ग भरून घेतला जाईल. तसेच दवाखान्याकडे अत्याधुनिक असलेली सर्व प्रकारची यंत्रसामग्री स्थापित झाल्यानंतर शासनाचा हा सामान्य दवाखाना (जनरल हॉस्पिटल) इचलकरंजी शहर व परिसरातील नागरिकांना अत्यंत आधुनिक व चांगली आरोग्य सेवा पुरविल. (प्रतिनिधी)

आता कृष्णा नदीतूनच पाणीपुरवठा
पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे नजीकच्या एक-दोन दिवसांत या नदीतून नळ पाणीपुरवठ्यासाठी होणारा उपसा बंद केला जाईल. त्यामुळे नजीकच्या उन्हाळ्याच्या कालावधीत कृष्णा नदीतील शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नदीमध्ये शहरास आवश्यक असलेली पाण्याची पातळी व साठा उपलब्ध करून देण्याकरिता पाटबंधारे खात्याला कळविण्यात आले आहे. तांत्रिक दुरुस्तीचे अपवाद वगळता शहरास सातत्याने दोन दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा होईल. त्याचबरोबर शहरातील कूपनलिकांवर टायमर बसवून नागरिकांना सकाळ-संध्याकाळ योग्य वेळी पाणीपुरवठा केला जाईल. याशिवाय आणखीन १७ कूपनलिकांवर सबमर्सिबल पंप बसवून त्याचे पाणीही नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Web Title: Solar City and Wi-Fi services are free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.