अतिदुर्गम भागातील पूरबाधितांसाठी ऊर्जामंत्र्यांकडून सौरदिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:19+5:302021-07-27T04:26:19+5:30
कोल्हापूर: जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील पूरबाधितांचा वीज पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे, तोपर्यंत त्यांच्या घरातील अंधार दूर व्हावा म्हणून ...
कोल्हापूर: जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील पूरबाधितांचा वीज पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे, तोपर्यंत त्यांच्या घरातील अंधार दूर व्हावा म्हणून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ५०० सौरदिवे पाठवून दिले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ते दिवे लगेच या दुर्गम भागात पोहोच करण्यास सुरुवात केल्यामुळे प्रकाश नसल्याने होणाऱ्या गैरसाेयीतून काही प्रमाणात सुटका झाली आहे.
मागील चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातले आहे. घरा-घरात पाणी शिरल्याने शहरासह अनेक गावांतील लोक विस्थापित झाले आहेत. या महापुराचा फटका महावितरणच्या यंत्रणेलाही बसला आहे. उपकेंद्रे , वीजवाहिन्या, रोहित्रे पाण्याखाली गेली आहेत. विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा बाधित झाला आहे. महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अहोरात्र शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अद्यापपर्यंत ३ लाख २५ हजार बाधित ग्राहकांपैकी २ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे. आणखी दोन दिवसात शहरातील वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकतो. परंतु ग्रामीण व अतिदुर्गम भागातील वीजपुरवठा पूर्वपदावर येण्यास वेळ लागू शकतो, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तातडीने हे सौरदिवे देण्यात आले आहेत. या सौरदिव्यात टॉर्च, मोबाईल चार्जिंगची सुविधा आहे. साप, विंचू व वन्यप्राण्यांपासूनचा धोका सौरदिव्यांच्या प्रकाशामुळे कमी होणार आहे. कोल्हापुरात हे सौरदिवे वितरित करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी प्रायोगिक तत्त्वावर महावितरणकडून शिरोळ तालुक्यातील शिरटी येथील पूरबाधित फुलाबाई सदामते यांना सौरदिवा वितरित करण्यात आला. महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत गरज असलेल्या वस्त्यांवर हे सौरदिवे पोहोचविले जाणार आहेत.
फाेटो: २६०७२०२१-कोल-महावितरण
फोटो ओळ:
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील पूरबाधितांसाठी सौरदिवे पाठवले आहेत. गुरुवारी महावितरणकडून शिरटी ता. शिरोळ येथील फुलाबाई सदामते यांना उपविभागीय अधिकारी अमोल माने यांच्याहस्ते सौरदिवा देण्यात आला.