सोलरच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या, चीन, तुर्कस्थानने बिघडविले गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:02 PM2020-11-30T17:02:50+5:302020-11-30T17:06:51+5:30
Solar prices, kolhapurnews शून्य बिलात गरम पाणी देणारे म्हणून सोलरचा पर्याय जवळ केला जात असतानाच आता अचानक दरवाढीला सामोरे जावे लागले आहे. दोन ते पाच हजारांपर्यंत किमती वाढल्या आहेत. चीन आणि तुर्कस्थानमध्ये सुरू असलेल्या घडामोडीमुळे सोलरचे पार्ट महागले आहेत. शिवाय कोरोनामुळे आयात-निर्यातीचे चक्र विस्कटल्याने कार्गो वाहतूकदारांनी वाढ केल्याचाही परिणाम सोलरच्या किमती वाढण्यावर झाला आहे.
नसिम सनदी
कोल्हापूर : शून्य बिलात गरम पाणी देणारे म्हणून सोलरचा पर्याय जवळ केला जात असतानाच आता अचानक दरवाढीला सामोरे जावे लागले आहे. दोन ते पाच हजारांपर्यंत किमती वाढल्या आहेत. चीन आणि तुर्कस्थानमध्ये सुरू असलेल्या घडामोडीमुळे सोलरचे पार्ट महागले आहेत. शिवाय कोरोनामुळे आयात-निर्यातीचे चक्र विस्कटल्याने कार्गो वाहतूकदारांनी वाढ केल्याचाही परिणाम सोलरच्या किमती वाढण्यावर झाला आहे.
गरम पाण्यासाठी गिझर आणि हिटरला पर्याय म्हणून अलीकडे सोलर वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. एकदाच गुंतवणूक केल्यानंतर पुढे खर्च नसल्याने सोलर मोठ्याप्रमाणावर बसविले जात आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात महिन्याकाठी हजारभर सोलरची विक्री होते. शहरापासून गावापर्यंत सर्वत्र सोलरचा वापर वाढला आहे.
असे असताना अचानक दरात वाढ झाल्याने ग्राहकांसह वितरकही हबकले आहेत. यामागील कारणांचा मागोवा घेतला असता, चीन आणि तुर्कस्थानमुळे हे पुरवठ्याचे गणित विस्कटले असल्याचे सांगण्यात आले. सोलरमध्ये लागणाऱ्या ट्यूब या फक्त चीन आणि तुर्कस्थानमध्येच तयार होतात.
भारतात त्या बनत नाही. आयातीवरच विसंबून राहावे लागते. कोरोनामुळे जगभरातील आयात-निर्यातीची साखळीच उद्ध्वस्त झाली आहे. मागणी व पुरवठा यात मोठा फरक पडला आहे. या दोन्ही देशांतून भारतात येणाऱ्या ट्यूब या समुद्रमार्गे जहाजातून कार्गोतूून येतात. एक कार्गो माल घेऊन उतरला की त्यातूनच इतर माल पाठविला जातो. आयात-निर्यातीचे चक्रच विस्कटल्याने कार्गोही रिकामे जात आहेत. त्यामुळे चीनमधील कार्गो संघटनेने वाहतुकीच्या दरात वाढ केली आहे.
ट्यूबच्या किमती वाढल्या
वाहतूक वाढल्याचा परिणाम होऊन ट्यूबच्या दरातही ६० रुपये वाढ झाली आहे. एका ट्यूबची किंमत ६०० रुपये असते. १०० लिटरच्या सोलरसाठी १०, १५० लिटरसाठी १५, २०० लिटरसाठी २०, २५० लिटरसाठी २५, ३०० लिटरसाठी ३० ट्यूब लागतात. ट्यूब वाढल्याने एकूणच सोलरच्या किमतीत २ ते ५ हजारांनी वाढ झाली आहे.
सोलरच्या सध्याच्या किमती
- १०० लिटर : १५०००
- १५० लिटर : २००००
- २०० लिटर : २५०००
- २५० लिटर : २७००००
- ३०० लिटर : ३५०००
सोलरसाठी लागणाऱ्या ग्लास ट्यूब चीनमधून येतात. सध्या आयात-निर्यातीवर परिणाम झाला असल्याने त्यांच्याकडूनच किमती वाढून आल्या आहेत. शिवाय टॅक्सही वाढल्याने पहिल्यांदाच दरवाढीचा सामना करावा लागत आहे.
- मोहन पाटील,
सोलर डिलर
आपण कितीही आत्मनिर्भर म्हटले की सोलरच्या बाबतीत चीनवरच अवलंबून राहावे लागते. चीनबरोबर सीमा संघर्ष सुरू असला तरी त्याचा व्यापारावर काहीही फरक पडलेला नाही. फक्त कोरोनामुळे कार्गोचेही चक्र विस्कटले असल्याने त्यांच्याकडून दरात वाढ केली गेली आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावरही वाढ करावी लागली आहे.
- पी. बी.पाटील,
समृद्धी सोलर