कोल्हापूरचा जवान अरुणाचलमध्ये शहीद, पाच महिन्यांचा मुलासोबतची पहिली भेट अधुरीच राहिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 00:13 IST2025-03-15T00:07:11+5:302025-03-15T00:13:43+5:30
Kolhapur News: अरूणाचल प्रदेशमध्ये रस्त्यावरील बर्फ कंटिंगचे काम चालू होते. सुनील हे डोजरवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते.

कोल्हापूरचा जवान अरुणाचलमध्ये शहीद, पाच महिन्यांचा मुलासोबतची पहिली भेट अधुरीच राहिली
पिशवी : अरुणाचाल येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचे वाहन ५०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघात शित्तुर तर्फ मलकापुर (जि. कोल्हापूर) येथील जवान सुनील विठ्ठल गुजर शहीद झाले. १३ मार्च रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये चीन सीमेलगत हिमस्खलन झाले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अरूणाचल प्रदेशमध्ये रस्त्यावरील बर्फ कंटिंगचे काम चालू होते. सुनील हे डोजरवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. याचदरम्यान, डोजर ५०० फूट खोल दरीत कोसला. या अपघातात जवान सुनील गुजर यांना वीरमरण आले.
२०१९ मध्ये ते सेवा दलात रुजू झाले होते. ११० इंजिनीयर रेजिमेंट बॉम्बे या युनिटमध्ये कार्यरत होते. दोन वर्षापूर्वी त्यांचा गावातील आबाजी पाटील यांची कन्या स्वप्नाली यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना ५ महिन्यांचा मुलगा आहे.
शनिवारी होणार अंत्यसंस्कार
शहीद जवांनाचे पार्थिव १४ मार्च रोजी रात्री अरूणाचल येथील दिब्रुगड येथे येणार असून, त्यांनतर ते जवानाच्या मूळ गावी शित्तुर तर्फे मलकापुर येथे शनिवार रात्रीपर्यंत पोहचणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
गावातच गुजर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. हे वृत्त गावात धडकल्यानंतर गावावर शोककळा पसरली.
सुट्टी रद्द झाली आणि मृत्यूने गाठलं
१२ मार्चला जवान गुजर हे गावी येणार होते. पण, भूस्खलन व सेवा दलांतील तातडीच्या सेवेसाठी दहा दिवसांसाठी रजा रद्द करण्यात आली होती. मुलाचे जावळ व गावच्या यात्रेसाठी ते २ महिन्यांच्या रजेवर येणार होते.
सहा महिन्यांपूर्वीच ते गावावरून अरुणाचल येथे रुजू झाले होते. त्यांनतर पाच महिन्यांपूर्वी त्यांना मुलगा झाला होता. मुलाला पहिल्यांदा बघणार होते. पण, त्यापूर्वीच ते शहीद झाले. बाप लेकाची भेट कायमची अधुरी राहिल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.