सैनिक टाकळीत मगर पकडली
By Admin | Published: November 18, 2014 10:30 PM2014-11-18T22:30:08+5:302014-11-18T23:32:24+5:30
कृष्णा नदीत जेरबंद : सुमारे सात फूट लांब; गवत कापणाऱ्या शेतकऱ्यांना आढळली
कुरुंदवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीकाठावरील कुरणात सुमारे सात फूट लांबीची मगर शेतकऱ्यांनी अत्यंत धाडसाने जेरबंद केली. सकाळी दहा वाजता मगरीला दोरखंडाने बांधून ग्रामपंचायतीजवळ आणून बांधून ठेवले. सायंकाळी शिरोळ वनविभागाचे अधिकारी मगरीला घेऊन गेले. दरम्यान, ग्रामस्थांनी मगर पकडल्याचे समजताच तिला पाहण्यासाठी ग्रामपंचायतीसमोर अबालवृद्धांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
कृष्णा नदीपात्रात मगर असल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले होते. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांतून भीती व्यक्त होत होती. आज, मंगळवारी सकाळी टाकळी-खिद्रापूर रस्त्यावरील नदीकाठच्या कुरणामध्ये गवत कापण्यासाठी जयसिंग पाटील गेले होते. गवत कापत असताना गवतामध्ये मगर असल्याचे दिसताच त्यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी विद्याधर पाटील, संभाजी गायकवाड, अनिल पाटील, अमर पाटील, संजय गायकवाड हे दोरखंडासह अन्य साहित्य घेऊन आले. त्यांनी अत्यंत धाडसाने प्रथम तोंडाला व नंतर शेपटीला दोरखंडाने आवळून बांधून मगरीला ग्रामपंचायतीसमोर आणून ठेवले व शिरोळ येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले.
नदीपात्रात मगर असल्याचे अनेकांनी पाहिले होते. प्रत्यक्षात ती सापडली असल्याबाबत नागरिकांचा विश्वास बसत नव्हता.
दरम्यान, मगरीला ग्रामपंचायतीसमोर आणून बांधल्याने व वनविभागाचे अधिकारी लवकर न आल्याने मगरीला ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी टाकळीसह परिसरातील नागरिकांसह अबालवृद्धांनी गर्दी केली होती. सायंकाळी वनविभागाचे अधिकारी आर. बी. पताडे व आर. बी. मोरे मगरीला चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी घेऊन गेले.
शिरोळ तालुक्यातील नद्यांमध्ये मगरी
शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा नदीपात्रात मगरीचा वावर अनेकांनी पाहिला होता. मात्र, प्रत्यक्षात ती सापडत नसल्याने नागरिकांचा विश्वास बसत नव्हता. मात्र, गणेशवाडी, टाकळी येथे मगरीला पकडल्याने तालुक्यातील तिच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांतून भीती व्यक्त होत आहे. वनविभागाने पथक नेमून मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.